कांद्याचे दर घसरल्याने पंतप्रधानांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:28 PM2020-05-24T22:28:18+5:302020-05-24T22:28:52+5:30
राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी चार रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. खर्डे येथील संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
खर्डे : राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे. आज कांद्याचे सरासरी दर अगदी चार रुपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे. खर्डे येथील संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
केंद्र सरकारने कांद्याला नुकतेच जीवनावश्यक वस्तूंच्या सूचीतून वगळले आहे; परंतु कांद्याच्या दरातील घसरण थांबण्यास तयार नाही. आधी अतिवृष्टी, नंतर निर्यातबंदी व आता कोरोना महामारीमुळे एकामागून एक लॉकडाउनमुळे कांद्याचे दर सतत घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात रविवारी कांदा उत्पादक शेतकºयांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे आपल्या व्यथा कळविल्या. अशा परिस्थितीत भविष्यात कांद्याचे दर अजून कोसळण्याची भीती शेतकºयांना भेडसावत आहे. त्यामुळे केंद्राने आमचा कांदा २० रु. प्रतिकिलो दराने खरेदी करून शेतकºयांच्या पाठीशी उभे रहावे, अशी विनंती मोदी यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यातील इतर शेतकºयांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य कांदा उत्पादक संघटनेचे जयदीप भदाणे यांनी केले. यावेळी खर्डे गावातील कांदा उत्पादक शेतकरी व कृष्णा जाधव, बापू देवरे, भाऊसाहेब मोरे, शशिकांत पवार आदी शेतकरी उपस्थित होते.
प्रतिकिलो २० रुपये या दराने केंद्राने कांदा खरेदी करावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने एक लाख शेतकºयांच्या व्यथा पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे कळवून आंदोलनात सहभाग घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समित्या चाल- बंद असल्याने शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक आहे.