संजय पाठक/ नाशिक- कांदा निर्यात बंदीवरून नाशिकचे राजकारण अगोदरच तापले त्यात लोकसभा निवडणूकांचा प्रचार सुरू झाल्याने कांदा हा प्रचाराचामुद्दा झाला आहे. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नाशिकमधील त्यांच्या सभेत कांद्याच्या विषयावर भूमिका मांडण्याची शक्यता आहे. येत्या १० मे रोजी दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव बसवंत येथे सभा घेणार आहेत.
त्यावेळी कांदा प्रश्नावर ते बोलण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी कांदा निर्यात बंदी घातल्यानंतर शेतकरी आणि व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त करीत आंदोलने केली हेाती. लाेकसभा निवडणूकीची घोषणा होण्यापूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवली जाण्याची शक्यता होती तसे न झाल्याने नाशिक मध्ये कांदा हा प्रचाराचा मुद्दा बनला आहे. त्यामुळेखास करून कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे सभा हेाणार आहे, असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले