मनपाला उत्पन्नवाढीसाठी खासगीकरणाचा आधार
By admin | Published: April 21, 2017 01:43 AM2017-04-21T01:43:02+5:302017-04-21T01:43:15+5:30
नाशिक : महापालिकेची उत्पन्नवाढीसाठी खासगीकरणाच्या माध्यमातून प्रकल्प राबविण्याची घोषणा स्थायी समितीचे सभापती गांगुर्डे यांनी केली.
नाशिक : महापालिकेची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता उत्पन्नवाढीसाठी खासगीकरणाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबविण्याची घोषणा स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी केली. प्रामुख्याने, मनपाच्या जागांवर पालिका बाजारांची निर्मिती, आडगाव ट्रक टर्मिनस याठिकाणी टेक्स्टाइल्स मार्केट, महापालिकेच्या मालकीच्या जाहिरात फलकांची संख्या वाढविणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय सभापतींनी जाहीर केले.
महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर स्थायी समितीची विशेष अंदाजपत्रकीय सभा गुरुवारी (दि. २०) झाली. यावेळी सदस्यांनी उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना सुचवतानाच महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावरही ताशेरे ओढले. चर्चेनंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सांगितले, महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शिक्षण मंडळाच्या काही इमारतींमध्ये काही कार्यालये आहेत. त्यांना रेडीरेकनरप्रमाणे भाडेवाढ करण्यात येईल. महापालिकेच्या मालकीचे शहरात केवळ ४० जाहिरात फलक आहेत. त्यांची संख्या १५० पर्यंत तर खासगी फलकांची संख्या ७३२ वरुन १५०० पर्यंत करण्यात येऊन त्याद्वारे उत्पन्नात वाढ करण्यात येईल. सदर जाहिरात फलकांचा नव्याने सर्वे करण्याचे आदेशही सभापतींनी दिले. ज्याठिकाणी पालिका बाजार चालत नाही, जेथे व्यावसायिक भाडे भरत नाहीत तेथील इमारती पाडून वाहनतळांसाठी व्यवस्था करण्यात यावी. रविवार कारंजावरील यशवंत मंडईच्या जागेत बहुउद्देशीय वाहनतळ साकारण्यात येईल. काही ठिकाणी जुने झालेले पालिका बाजार पाडून तेथे नव्याने बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे संबंधित पालिका बाजारातील थकबाकीदार गाळेधारकांकडून तातडीने वसुली करावी व नोटिसा देऊन गाळे रिकामे करून घ्यावेत, असे आदेश सभापतींनी दिले. सदर पालिका बाजारांचा पुनर्विकास हा बीओटी तत्त्वावर करण्यात येणार आहे. तिबेटियन मार्केट याठिकाणी व्यापारी झोन तयार करून त्याठिकाणी असलेले जुने गाळे पाडून मॉल विकसित करण्याचे नियोजन आहे. आडगाव येथील ट्रक टर्मिनसच्या जागेत ओझरच्या धर्तीवर टेक्स्टाइल मार्केटची उभारणी होईल. द्वारका येथेही बीओटी तत्त्वावर मार्केट विकसित करण्यात येणार आहे. महापालिकेचे तरणतलाव हे खासगीकरणातून चालविण्यासाठी प्रयत्न केले जातील. फाळके स्मारक व बौद्ध स्मारक याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. मोबाइल टॉवरसाठी असलेल्या भाडेदरात सुधारणा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या उद्यानांच्या जागेत जाहिरात फलकांना परवानगी देऊन त्या माध्यमातूनही उत्पन्न वाढविता येईल. ‘कपाट’चा प्रश्न मार्गी लागल्यानंतर त्यातूनही महापालिकेला सुमारे ५० ते ६० कोटी रुपये प्राप्त होण्याची अपेक्षा सभापतींनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)