प्रियांका गांधीमुळे कॉँग्रेसचा जनाधार वाढणे अशक्य : जाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:25 PM2019-02-11T23:25:55+5:302019-02-12T00:28:09+5:30
कॉँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी यांच्यामुळे भाजपाला फरक पडणार नाही. केवळ गांधी परिवारात आणखी एक सदस्य राजकारणात सक्रिय झाला, या पलीकडे त्याला महत्त्व नसल्याचे सांगत भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कॉँग्रेसवर टीका केली. सध्या भाजपा-सेनेत युतीच्या चर्चा झडत असल्याने या विषयावर त्यांनी न बोलणेच पसंत केले.
नाशिक : कॉँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी यांच्यामुळे भाजपाला फरक पडणार नाही. केवळ गांधी परिवारात आणखी एक सदस्य राजकारणात सक्रिय झाला, या पलीकडे त्याला महत्त्व नसल्याचे सांगत भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कॉँग्रेसवर टीका केली. सध्या भाजपा-सेनेत युतीच्या चर्चा झडत असल्याने या विषयावर त्यांनी न बोलणेच पसंत केले.
भाजपाच्या वतीने मन की बात, मोदी के साथ या जाहीरनाम्यात लोकांच्या सूचना समावेश करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याची माहिती देण्यासाठी सोमवारी (दि. ११) वसंतस्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असून, पंतप्रधान ठरविण्याची क्षमता असलेले राज्य आहे. परंतु कॉँग्रेसची सत्ता येथून केव्हाच गेली आहे. त्यामुळे आता प्रियांका गांधी कॉँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या तरी त्यांच्या पक्षाला जनाधार मिळणार नाही, असेही ते म्हणाले. विरोधकांच्या महाआघाडीविषयी बोलताना ज्यांचा नेता एक नाही, सूत्र एक नाही किंवा अजेंडाही एक नाही, असे सर्व एकत्र आले आहेत. सत्तेसाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. तेथे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हे एकत्र आले असून, नागरिकांना हे सर्व माहिती असल्याने त्याचा परिणाम होणार नसल्याचेही जाजू म्हणाले.
राज्यात युतीची चर्चा होत आहे. १९८४ पासूनची भाजपा-शिवसेनेची मैत्री आहे. मात्र त्याबाबत पक्षाची संसदीय समिती निर्णय घेईल, असे सांगतानाच उत्तर महाराष्टÑातील काही जागांवरून सुरू असलेल्या रस्सीखेचीबाबतदेखील समितीच निर्णय घेईल, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, माजी शहराध्यक्ष विजय साने, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित होते.