मालेगाव तालुक्यात काश्मिरी सफरचंदाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 11:40 PM2020-09-02T23:40:20+5:302020-09-03T01:47:23+5:30

मालेगाव : काश्मिरात उत्पादित होणारे सफरचंद आता तालुक्यातील आघार शिवारात दिसू लागले असून, ही किमया केली आहे प्रयोगशील शेतकरी हिरामण शिवराम मानकर यांनी.

Production of Kashmiri apples in Malegaon taluka | मालेगाव तालुक्यात काश्मिरी सफरचंदाचे उत्पादन

आघार शिवारात खजुराच्या रोपाबरोबर हिरामण आणि शिवराम मानकर.

Next
ठळक मुद्देखजुराचीही केली लागवड : आघार येथे शेतकरी हिरामण मानकर यांचा प्रयोग

शफीक शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : काश्मिरात उत्पादित होणारे सफरचंद आता तालुक्यातील आघार शिवारात दिसू लागले असून, ही किमया केली आहे प्रयोगशील शेतकरी हिरामण शिवराम मानकर यांनी.
आघार शिवारात शिवराम बापू मानकर (८२) यांची अवघी सहा एकर जमीन. त्यांचे चिरंजीव हिरामण मानकर हे चांदवड येथे गटविकास अधिकारी होते.
सेवानिवृत्त झाल्यानंतर वडिलोपार्जित जमिनीत शेती करायचे त्यांनी ठरवले. मात्र पारंपरिक शेतीत त्यांना रस नव्हता. काही तरी वेगळे करण्याची जिद्द मनात होती. शेतात डाळिंब पीक त्यांनी घेतले होते मात्र तेल्या रोगाने डाळिंबबागा उद्ध्वस्त होत असल्याने त्यांनी नवीन पिकाचा शोध सुरू केला. यू-ट्यूबवर अभ्यास सुरू केला. उष्ण प्रदेशात येणारी सफरचंदाची जात विकसित केली असल्याची माहिती त्यांना मिळाली. एचआरएमआयवाय ही उन्हाळ्यात ४५ ते ४८ अंश तपमानात टिकून राहणारी सफरचंदाची जात असल्याने तिची लागवड करण्याचा निर्धार त्यांनी केला. हिमाचल प्रदेशात पनयाला, जि. बिलासपूर येथील हरिमन शर्मा यांनी ही जात १९९९ मध्ये विकसित केल्याचे हिरामण मानकर यांना कळाले. आॅक्टोबर २०१९ मध्ये ही माहिती मिळाली. तत्कालीन राष्ट्रपती अबुल कलाम यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनात ३५ रोपे शर्मा यांनी लावली होती. एकेका रोपाला ३५० सफरचंदाची फळे लागली होती. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.
हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी मानकर यांना अहमदाबादच्या नॅशनल इन्व्होवेशन फाउण्डेशन यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. आॅक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी रोपांची बुकिंग केली. दीड एकरात मानकर यांनी ३१५ सफरचंदाच्या रोपाची लागवड केली. वर्षभरात सुमारे पाच फूट झाड वाढते. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान पानगळ होते आणि फेब्रुवारीत झाडांना फुले येतात. जूनमध्ये फळे परिपक्व होतात. फळांना शंभर रुपये किलो दर मिळतो त्यामुळे ही परवडणारी शेती असल्याचे मानकर यांनी सांगितले.खजुराची लागवडमानकर यांनी एका एकरात बदई जातीच्या खजूर पिकाची लागवड केली आहे. साधारणपणे तिसऱ्या वर्षी फळ लागते. चौथ्या वर्षांपासून एकेका झाडाला दोन क्विंंटल माल येतो. ओली खजूर विकली तरी दहा लाखांचे उत्पन्न येते. यालादेखील फारसा खर्च येत नाही.
सफरचंदासाठी खडकाळ पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. पिकाला पाणी कमी लागते. यामुळे मानकर यांनी ठिबक सिंचन करून घेतले आहे. त्यासाठी त्यांना दहा हजार, तर कुरिअरने रोपे मागवण्यासाठी २५ हजार रुपये खर्च आला आहे.

Web Title: Production of Kashmiri apples in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.