द्राक्षाचे दर घसरल्याने उत्पादक चिंतित
By admin | Published: April 5, 2017 12:45 AM2017-04-05T00:45:19+5:302017-04-05T00:45:35+5:30
युरोपात नाशिकच्या द्राक्षांना स्पर्धा : नवीन वाण विकसित करण्याची गरज
नाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून युरोपसह विविध देशांमध्ये द्राक्षाची निर्यात होते. गेल्या दोन-तीन वर्षांत दुष्काळी परिस्थिती असतानाही ७६ हजार टनहून अधिक द्राक्षांची निर्यात झाली.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षीही मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन झाले आहे; मात्र यावर्षी थंडी अधिक काळ रेंगाळल्याने द्राक्षांचे मणी वाढू शकले नाही. शिवाय द्राक्षांमध्ये साखर भरण्याचे प्रमाणही परदेशी मालाच्या तुलनेत कमी राहिल्याने युरोपात नाशिकच्या द्राक्षांना मागणी घटली आहे. त्यामुळे उत्पादकांनी देशांतर्गत बाजारपेठेत माल पाठविला. परंतु उत्पादनच मोठ्या प्रमाणात आले असल्याने द्राक्षाचे भाव १५ ते २० रुपयांनी घसरले असून, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातून मागील वर्षी युरोपमध्ये ७६ हजार ४२५ टन, तर युरोपव्यतिरिक्त अन्य देशांत सुमारे २५ हजार टन द्राक्ष निर्यात झाली होती. त्या तुलनेत यंदा युरोपात आतापर्यंतच ८० हजार टन द्राक्षे पाठविण्यात आली असून, यातील मोठा माल बाजारात पडून आहे.
युरोप व्यतिरिक्त अन्य देशांत सुमारे २५ हजार ५०० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. यंदा कॅनडा, रशिया, चीनसह बांगलादेशातही द्राक्षे पाठविण्यात आली आहेत. युरोपात नाशिकच्या द्राक्षांसोबतच अन्य देशांमधूनही द्राक्षांचीही आयात होऊ लागल्याने भारतीय द्राक्षांच्या भावात काही प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या वर्षी युरोपमध्ये एका किलोला रु. ४५ ते ५० आणि इंग्लंडमध्ये ६० ते ६५ रुपये असा भाव मिळाला होता; मात्र यंदा अन्य देशांमधून युरोपात मोठ्या प्रमाणात आलेल्या द्राक्षांमुळे भारतीय द्राक्षांना युरोपमध्ये ३८ ते ४२ तर इंग्लंडमध्ये ५० ते ५५ रुपये भाव मिळतो आहे.
युरोपमध्ये भारताशिवाय चिलीसारख्या देशामधून येणाऱ्या द्राक्षांचा कालावधी संपत आला असून, असून लवकरच युरोपात दाखल होणारी ही द्राक्षे कमी होण्याची शक्यता आहे, ही द्राक्षे कमी झाल्यानंतर नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांना निर्यातवृद्धीची आशा आहे.
दरम्यान, निर्यातदर कमी मिळत असल्याने काढलेली द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेत पाठविण्यात येत आहेत; परंतु देशांतर्गत बाजारपेठेतही द्राक्षांना फारशी मागणी नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या भावात किलोमागे ५ ते १० रुपयांची घसरण झाली आहे. (प्रतिनिधी)