सिन्नर : आगासखिंड येथील शताद्बी अभियांत्रिकी महाविद्यालयात कामावर जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक प्राध्यापक ठार, तर अन्य एक जखमी झाला. सिन्नर-घोटी मार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास सदर अपघात झाला.नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात वास्तव्यास असलेले व सिन्नर तालुक्यातील आगासखिंड येथील शताब्दी अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीला असलेले योगेश शंकर शर्मा (३२) (मूळ राहणार. शिरपूर, धुळे) व अमित लांडगे हे दोघे प्राध्यापक आपल्या दुचाकीने सकाळी महाविद्यालयात निघाले होते. पांढुर्लीच्या पुढे सोनवणे मळ्याजवळ समोरून येणारा टेम्पोने दुचाकीला समोरासमोर धडक दिली. यात जखमी दोघा प्राध्यापकांना एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, योगेश शर्मा यांचा मृत्यू झाला. तर अमित लांडगे (रा. संगमनेर) यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शर्मा यांचे सिन्नर पालिका रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह शिरपूर येथे नेण्यात आला. या घटनेमुळे आगासखिंड येथील शिक्षण वर्तुळावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एम. एम. देशमुख अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर)
टेम्पोच्या धडकेने प्राध्यापक ठार
By admin | Published: December 10, 2015 12:05 AM