सुरगाणा तालुक्यात मद्यासह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 01:42 AM2021-01-23T01:42:37+5:302021-01-23T01:43:03+5:30
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा गावाच्या हद्दीत छापा मारून विविध प्रकारचा मद्यसाठा व सदर मद्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने असा सुमारे १ कोटी ५८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे.
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा गावाच्या हद्दीत छापा मारून विविध प्रकारचा मद्यसाठा व सदर मद्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने असा सुमारे १ कोटी ५८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे.
भरारी पथकाने गुरुवारी (दि. २१) महाराष्ट्र - गुजरात सीमेजवळ सुरगाणा तालुक्यातील बर्डीपाडा - परगाणा रोडवर एका पत्र्याच्या शेडसह आजूबाजूला छापा मारला. यावेळी दादरा व नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाकरिता निर्मित व विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला. पथकाने हा मद्यसाठा जप्त करतानाच सदर मद्याची बेकायदेशीर वाहतूक करण्याकरिता वापरण्यात आलेला आयशर कंपनीचा टेम्पो (क्रमांक डीएन ०९ एस ९७७४), आयशर कंपनीचा टेम्पो (क्रमांक डीएन ०९ यु ९४४८), फोर्स कंपनीचे क्रूझर वाहन (क्रमांक एमएच ४१ सी ६७८२), मारूती सुझुकी कंपनीचे वाहन (क्रमांक एमएच ०३ अेआर ९९१७) असा एकूण १ कोटी ५८ लाख २२ हजार ५०४ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी गिरीश भिका पवार (२३, रा. उंबरठाण, ता. सुरगाणा), हेमंत झांबरू मोरे (२२, रा. बापळून, ता. सुरगाणा) व शैलेश महादू गावित (३०, रा. सातवाकल, ता. धरमपूर, जि. बलसाड, गुजरात) यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करणाऱ्या पथकात निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड, एस. व्ही. बोधे व जवान कांबळे, शेख, नेमाडे, कदम, झिंगळे यांचा समावेश हाेता. गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक दिगंबर शेवाळे करत आहेत.