पक्षी अभयारण्य वाचविण्यासाठी वनसंरक्षकांना घेराव ; मासेमारी थांबविण्याची नेचर क्लबची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 05:07 PM2019-02-12T17:07:59+5:302019-02-12T17:15:46+5:30
नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. या मासेमारीमुळे येथे जगभरातील विविध भागातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असून, त्याचा पक्षी अभयारण्याच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने येथील मासेमारी थांबविण्यात यावी तसेच अभयारण्याचे नाशिकमधील कार्यालय नांदूरला स्थलांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे मंगळवारी (दि.१२) मुख्य वनसंरक्षकांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.
नाशिक : नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. या मासेमारीमुळे येथे जगभरातील विविध भागातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असून, त्याचा पक्षी अभयारण्याच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने येथील मासेमारी थांबविण्यात यावी तसेच अभयारण्याचे नाशिकमधील कार्यालय नांदूरला स्थलांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे मंगळवारी (दि.१२) मुख्य वनसंरक्षकांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.
नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे नांदूरमधमेश्वर येथील मासेमारी थांबविण्यासोबतच, कार्यालय स्थलांतराच्या मागणीसह जखमी पक्ष्यांना अभयारण्यात उपचार मिळण्यासाठी उपचार केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पक्षी संरक्षण समिती स्थापन करावी, गाइड काम करणाऱ्या तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, पर्यटकांना विविध सुविधा मिळव्यात, तसेत अधिकाºयांना राजकीय नेत्यांच्या दबावातून मुक्त करण्यात यावे आदी मागण्यांसाठी संस्थेतर्फे वन्यजीव वनसंरक्षक अनिल अंजनकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पक्षिमित्र दिगंबर गाडगीळ, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, डॉ. विक्रांत जाधव, प्रमिला पाटील, सीमा पाटील, भारती जाधव, किरण बेलेकर, योगेश कापसे, अमोल दराडे, प्रमोद फाल्गुने, सर्पमित्र मनीष गोडबोले, प्रमोद महानुभाव, गिरीश ताजने, लक्ष्मीकांत कोतकर, रोहित नाईक, भाऊसाहेब राजोळे, सागर बनकर आदींसह शहरातील वन्यजीव व पक्षिमित्र घेराव आंदोलनात सहभागी झाले होते.
पक्ष्यांच्या मुखवट्यांसह आंदोलन
नाशिकमधील सर्व पक्षिमित्र, प्राणिमित्र, सर्पमित्र, वृक्षमित्र, पर्यावरणावर कार्य करणाऱ्या संस्था एकत्रित येऊन कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने मुख्य वनसंरक्षक नाशिक यांना घेराव घालून मृत पक्ष्यांसाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कायदेशीर कार्यवाई करण्याची मागणी केली. यावेळी निसर्ग मित्रांनी पक्ष्यांचे मुखवटे परिधान केले होते. दरम्यान, वनाधिकाऱ्यानी पक्ष्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कार्यवाही होणार असल्याचे सांगत पक्षी संवर्धन समिती स्थापन करण्याचेही आश्वासन दिले.