पोलिसाकडून रस्ता सुरक्षेसह पर्यावरणाचीही रक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 07:23 PM2020-06-06T19:23:37+5:302020-06-06T19:29:13+5:30
नाशिक : मुंबईहून नाशिक मार्गे जाणा-या परप्रांतीय कामगारांना मदतीचा हात म्हणून फुड पॅकेट आणि अन्य साहित्य दिले. परंतु त्यांनी ...
नाशिक: मुंबईहून नाशिक मार्गे जाणा-या परप्रांतीय कामगारांना मदतीचा हात म्हणून फुड पॅकेट आणि अन्य साहित्य दिले. परंतु त्यांनी त्यानंतर फेकून दिलेल्या प्लास्टीक पिशव्य आणि अन्य कच-याचा जागोजागी खच साचला. मात्र, त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून नाशिकचे एक निसर्गप्रेमी वाहतूक पोलीस सचिन जाधव यांनी टाकाऊतून टिकावू हे सूत्र अवलंबून या बाटल्यांमध्ये औषधी, वनस्पती, फुलझाडे फुलविली आहेत. त्यांच्या या उपक्र मातून त्यांनी ‘कोरोना’काळात रस्त्याची सुरक्षा आणि पर्यावरणाचीही रक्षा केली आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक बागेची हिरवळ आता पोलीस स्टेशन, विविध कार्यालयात आणि महामार्गावर दिसणार आहे.
लॉकडाउनमध्ये मुंबईकडून पायी निघालेल्या परप्रांतीयांनी वापरलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकिंगचा, प्लॅस्टिक बाटल्यांचा कचरा सर्वत्र पडलेला पाहून अनेकांना वाईट वाटले. मात्र महामार्गाची स्वच्छता करण्यासाठी कोणी पुढे आले नाही. मात्र याच कालावधीत महामार्गावर कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलीस सचिन जाधव यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी स्वयंस्फूर्तीने या प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करून त्यात फुलझाडांसह, तुळशी, अडुळसा, अश्वगंधा, कोरफड अशा औषधी वनस्पती लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
त्यांच्या या पर्यावरणपूरक बागेतील ही फुलझाडे आणि औषधी वनस्पती नाशिकमधील विविध पोलीस चौक्या कार्यालये, महामार्गावर बहरलेल्या दिसणार आहेत. हे कार्य करीत असताना जाधव यांनी महामार्गावरील बॅरिकेड्सवरही पर्यावरण रक्षणाचे, जनजागृतीचे फलकही लावले. तसेच काही बाटल्यांमध्ये पाण्याची सोय केली असून, ते पक्ष्यांसाठी ठेवण्यात आले आहे. अनेक तहानलेले पक्षी या भांड्यातील पाणी पिऊन त्यांची तहान भागवत आहेत. पर्यावरणाशी नाते जोडणा-या सचिन जाधव यांनी टाकावूपासून टिकाऊचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या उपक्र मातून कच-याची विल्हेवाट होणार आहेच, शिवाय नाशिक स्मार्ट सिटीलाही मोठा फायदा होणार आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी जाधव यांच्या उपक्र माचे कौतुक केले आहे. नाशिकमधील विविध पोलीस चौक्या आणि हद्दीतील महामार्गावर ही रोपे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.