सप्तशृंगगडावरील संरक्षक कठडे तुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:14 PM2019-04-02T23:14:03+5:302019-04-02T23:14:49+5:30
सप्तशृंगगड : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सप्तशृंगगड घाटातील संरक्षक कठडे व लोखंडी बॅरिकेट्स अजून किती जणांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल वाहनचालक व भाविक करीत आहेत.
सप्तशृंगगड : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान सप्तशृंगगड घाटातील संरक्षक कठडे व लोखंडी बॅरिकेट्स अजून किती जणांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल वाहनचालक व भाविक करीत आहेत.
येत्या १३ एप्रिलपासून सप्तशृंगगडावर मोठ्या उत्साहात चैत्रोत्सव सुरू होणार असून, यात्रा कालावधीत खासगी वाहनांना बंदी घातली असल्याने लाखो भाविकांना एसटीनेच प्रवास करावा लागतो. इतर दिवशीही ट्रॅव्हल, स्थानिक गाड्या व भाविक स्वत:ची वाहने घेऊन दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु नांदुरी ते सप्तशृंगगडाचा दहा किलोमीटरचा प्रवास भाविकांना अगदी जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे. त्यामुळे या चैत्रोेत्सवातही भाविकांना एसटीत प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वीच नवरात्र उत्सवानंतर पूजेचे साहित्य घेऊन जाताना गडावरील गणेश घाटात टेम्पोचालकाचा ताबा सुटल्याने अवघड वळणावर सातशे ते आठशे फूट दरीत जाता जाता बॅरिकेटसला वाहन अडकल्याने मोठी दुर्घटना टळली होती. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून येथील बॅरिकेटस तुटले असून, ते बदलण्याची तसदीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
संरक्षणासाठी लोखंडी बॅरिकेटस लावण्यात आले आहे; परंतु सध्या लोखंडी बॅरिकेटसचे हाल झाले आहेत. काही ठिकाणच्या अपघाती वळणावरचे लोखंडी बॅरिकेटस गायब झालेले दिसत आहे.अपघाती वळण काही बॅरिकेटस तुटलेल्या व वाकलेल्या अवस्थेत त्याच ठिकाणी पडलेले असून, गणेश घाटातील हे अपघाती व अवघड वळण असल्याने येथील वळणावरील येणारी व जाणारी वाहने दिसत नाहीत व येथीलच बॅरिकेटस तुटले असल्याने अपघाताची भीती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा याबाबत भोंगळ कारभार पहायला मिळत आहे.