पिंपळगाव टोल नाक्यावरील कथित गैरप्रकाराच्या निषेधार्थ धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 11:20 PM2021-09-16T23:20:39+5:302021-09-16T23:21:32+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील टोल नाक्यावर दररोज होत असलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या निषेधार्थ माजी जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या समर्थकांनी धरणे धरीत तत्काळ चौकशीची मागणी केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन प्रकल्प व तांत्रिक संचालकांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, यावेळी टोल नाका व्यवस्थापकास मारहाणही करण्यात आली.
पिंपळगाव बसवंत : येथील टोल नाक्यावर दररोज होत असलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या निषेधार्थ माजी जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या समर्थकांनी धरणे धरीत तत्काळ चौकशीची मागणी केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन प्रकल्प व तांत्रिक संचालकांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, यावेळी टोल नाका व्यवस्थापकास मारहाणही करण्यात आली.
पिंपळगाव टोल नाका गोंदे व शिरवाडे यांचे कलेक्शन स्कायलार्क कंपनी आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून वान नावाचे सॉफ्टवेअर टोल नाक्यावरील १६ लेन पैकी १४ लेनवर कार्यरत आहे. टोल नाक्याहून जेवढी वाहने जातील ते त्या वान सॉफ्टवेअरमार्फत दर्शविले जाते. त्यानुसार ठरवून दिलेली रक्कम अदा करण्यात येते.
कोविड काळात केंद्र शासनाने दर दिवसाला ३४ लाख रुपयांचे सूट दिली. याचा पुरेपूर फायदा घेत लेन क्र. २ आणि लेन क्र. १४ या ठिकाणी तांत्रिक हेराफेरी करून वान सॉफ्टवेअरऐवजी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने दुसरे खासगी सॉफ्टवेअर सुरू करून दररोज लाखो रुपयांची लूट केली जात असल्याची माहिती मिळताच निफाड तालुक्यातील भाजपचे विधानसभा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पिंपळगाव टोलनाका गाठून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरीत धरणे आंदोलन केले. यावेळी एका कार्यकर्त्याकडून व्यवस्थापक राजपूत यांना मारहाणदेखील करण्यात आली.
वरिष्ठ पिंपळगाव टोल नाक्यावर समक्ष येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन कदम यांच्याशी सविस्तर चर्चा करीत याठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याचे आधीच लक्षात आले होते. त्याची चौकशी व्हावी यासाठी दिल्लीच्या कार्यालयात पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. तसेच तांत्रिक संचालक दिलीप पाटील यांनी चौकशी करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचे पत्र दिल्यावर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.
दिवसाढवळ्या होणाऱ्या या आर्थिक लुटीची चौकशी मी वैयक्तिक स्तरावर केली असता, स्कायलार्क टोल प्लाझा दिवसाला होणारी टोल वसुली नॅशनल हायवेपासून लपवित असल्याचे निदर्शनास आले. पिंपळगाव टोल प्लाझावरून दिवसाला लाखो रुपयांची टोल वसुली होत असते. जी महिन्याकाठी करोडो रुपयांच्या घरात असते. नॅशनल हाय वे, नाशिकचे प्रकल्प संचालक, व्यवस्थापक यांच्या निष्काळजीपणामुळे ही करोडो रुपयांची रक्कम सरकारच्या खात्यात जमा होत नाही. सरकारच्या तिजोरीवर खुलेआम डल्ला मारला जात असून, याचा मी तीव्र निषेध करतो.
- यतीन कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य
आम्ही आजपर्यंत एकाही शेतकऱ्याची किंवा वाहनधारकांची लूट केलेली नाही. त्याची रीतसर पावती दिली आहे तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे ठरलेली रक्कम अदा केली आहे. मात्र यतिन कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी टोल नाक्यावर येऊन दमदाटी तसेच मारहाण करीत टोल नाक्यावर भ्रष्टाचार होत असल्याचे वदवून घेतले. त्यांना जो आरोप करायचा होता, तो त्यांनी कायदेशीररीत्या करणे गरजेचे होते, मात्र मारहाण करणे चुकीचे आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार देणार आहे.
- योगेशसिंह राजपूत, टोल नाका व्यवस्थापक
पिंपळगाव टोल नाक्यावरील कथित गैरप्रकाराची सखोल चौकशी करण्यात येत असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात कार्यालयाने मे २०२१ मध्येच चौकशी करण्याविषयी नवी दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) मुख्यालयाकडे कळविले आहे.
- बी. एस. साळुंके, प्रकल्प संचालक, नाशिक