पंचवटी : दिंडोरीरोडवरील पुणे विद्यार्थीगृह संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी सकाळपासून संस्थेच्या आवारात धरणे आंदोलन केले. कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध मागण्यांबाबत पुणे विद्यार्थीगृह संस्था प्रशासनाला निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. संस्थेत सफाई काम करणाऱ्या ७ महिलांना कामावरून कमी करून त्यांच्याजागी ठेकेदारी पद्धतीने काम सुरू केले आहे. गेल्या पाच ते सात वर्षापासून या महिला काम करत होत्या मात्र आता ठेकेदारी पद्धतीने काम सुरू केल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. संस्थेच्या नियमानुसार वेतनश्रेणी मिळणे गरजेचे असताना दोन, तीन कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मिळालेली नाही. ज्यांना अजूनही नियमित वेतनश्रेणी मिळाली नाही त्यांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी, म्हसरूळ संस्थेत स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आदिंसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत धरणे आंदोलन केले. कर्मचाऱ्यांना उदभवणाऱ्या विविध समस्या व अडचणी तसेच मागण्यांबाबत पुणे विद्यार्थीगृह प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून निवेदन दिले आहे, मात्र तरीदेखील प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)
पुणे विद्यार्थीगृह संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By admin | Published: October 14, 2016 12:10 AM