लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : येथे पाचकंदील चौकात शेतकरी बचाव जनजागृती आंदोलन करण्यात आले. यावेळी विनोद अहेर या शेतकऱ्याने आपल्या ट्रॅक्टरला शेतकरी संपाचे फलक व भोंगा लावून घोषणा देत तालुक्यात फेरी काढून जनजागृती केली.शेतकऱ्यांच्या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. राज्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून पुकारलेला शेतकरी संप देवळा तालुक्यात शंभर टक्के यशस्वी झाला असून, तालुक्यातून जाणारा भाजीपाला, दूध व सर्व प्रकारचा शेतमाल गावाबाहेर जाणार नाही यासाठी प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत जागरूक राहत प्रयत्न केले. शेतमाल घेऊन जाणारी वाहने, तसेच दूधविक्रीसाठी इतरत्र जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुचाकी सकाळीच गावात अडवून घरी परत पाठवण्यात आल्या. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंंत आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्यात येईल, असा ठाम निर्धार यावेळी पंकज आहिरराव, उपसरपंच विलास भामरे, लक्ष्मीकांत अहेर, जितेंद्र अहेर, रोशन अलिटकर, बंडू अहेर, शशिकांत शेवाळे, राजेंद्र अहेर, रवींद्र अहेर आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
देवळ्यात जनजागृती आंदोलन
By admin | Published: June 02, 2017 12:15 AM