नाशिक : राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत येत्या रविवारी (दि. १८) जानेवारीला नाशिक जिल्ह्यात विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील ४२ लाख ५२ हजार ५६९ लोकसंख्येतील ४ लाख ८५ हजार ६८ बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी सांगितले.तसेच विशेष बाब म्हणून बसस्थानक, रेल्वेस्थानक, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, रस्ता मजूर, बाजार, यात्रा या ठिकाणी बालकांना पोलिओ देण्यासाठी ट्रान्झिट पथके, मोबाइल पथके यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच वर्षांचा एकही बालक पोलिओ घेण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.रविवारच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी जिल्ह्यात ३३०२ लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष बूथवर डोस देणे, बालकांना बोलावून आणणे यासाठी ५८२४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पर्यवेक्षणासाठी ६६९ अधिकारी यांच्यामार्फत पर्यवेक्षण केले जाणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील पर्यवेक्षणासाठी दहा स्वतंत्र पर्यवेक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील १०४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २०६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेत पाच वर्षांच्या आतील सर्व बालकांना डोस पाजून घेण्याचे आवाहन डॉ. सुशील वाकचौरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
रविवारी पल्स पोलिओ मोहीम
By admin | Published: January 15, 2015 10:48 PM