नाशिक : गोदावरीला गेल्या रविवारी सोमवारी आलेल्या पुरामुळे नाशिकच्या सराफ बाजारातील लखलखती सोनेरी दुनिया आणि सोन्याचा झगमगाट पाण्याखाली गेला होता. आता पुराचे पाणी ओसरल्याने सराफ बाजारातील झगमगाट पुन्हा परतु लागला असला तरी याच सराफ बाजारातील गल्ल्यांमध्ये साचलेला गाळ, घाण, कचऱ्याची हाताने सफाई करीत सोन्याचे कण मिळवून झारेकरी समाजाच्या महिलांना जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सोन्याचे कण मिळवूण जगण्यासाठी या महिला रस्ता का झाडत आहेत. एक छोटासा ब्रश व एक लोखंडाची तार हातात घेऊन सराफ बाजारातील गल्लीचा कोपरांकोपरा या महिला स्वच्छ करतात. सराफ बाजारातील प्रत्येक दुकानाच्या बाहेर पडलेल्या कचऱ्यावर त्यांचे जीवन, चरितार्थ, रोजीरोटी पिढ्यानपिढ्या चालत आहे. दिवसभर रस्ता झाडून मिळणारा कचरा-माती गोळा करून तो नदीकाठी बऱ्याच वेळा पाण्यात धुतल्यानंतर त्यावरील कचरा/घाण पाण्याबरोबर वाहून जाते व पाटीमध्ये खाली राहिलेली माती/गाळ पुन्हा स्वच्छ केल्यानंतर खाली धातूचे बारीक बारीक कण रहातात. ते अलगद गोळा करून सुकवून चांदी-सोने जे धातुकण असतील ते जमवून सराफाकडे चांदी सोन्याचे परीक्षण करून ते विकतात. आलेल्या पैशातून रोजचा प्रपंच चालवला जातो. झारेकरी समाजातील ९० टक्के महिलाच या काम करतानात दिसून येतात.
पूर्ण आयुष्यच रस्ता झाडण्यात गेलेसराफ बाजारातील गल्ली संपूर्ण स्वच्छ करून पूर्वी या महिलांना दिवसाकाठी दोनशे ते तीनशे रुपये मिळत, परंतु, आता सराफी व्यवसायात झालेल्या नवीन नवीन यंत्रामुळे पाच-सहा दिवसांनंतर पाचशे ते सहाशे रुपये कमाई होते. या महिलांचे पूर्ण आयुष्यच रस्ता झाडण्यात गेले. आमच्यासमोर लहानाची मोठी झालेली मुले आज मोठमोठे व्यापारी झालेत, दिवस बदललेत. व्यवसाय वाढले. सोन्याचा भाव गगनाला भिडला. परंतु आम्ही आहे त्याच परिस्थितीत असल्याचे या झारेकरी महिला सांगतात. पहिले सकाळीच झाडायचो. परंतु आता रात्री दुकाने बंद होताच झाडायला सुरुवात करतो. कारण आम्ही नाही झाडले, तर दुसरा कोणी येऊन झाडून जाईल. उद्या जे काही मिळणार ते पण मिळायचे नाही, अशी स्थिती असल्याचे या महिला सांगतात.