हवामान खात्याच्या अंदाजाबरोबरच शेतकऱ्यांकडून नक्षत्रानुसार आजही पीकपाण्याच्या नियोजनावर भर दिला जातो. हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला असताना पंचांगकर्त्यांनी मात्र यंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचे भाकीत वर्तवलेले आहे. मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचेही पंचांगकर्त्यांनी म्हटलेले आहे. राेहिणीचा पाऊस चांगला बरसल्यानंतर शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात समाधानकारक पावसाची अपेक्षा होती. त्याच भरवशावर शेतकऱ्यांनी मशागत आटोपून पेरण्या केल्या. परंतु मृगाने डोळे वटारले आणि आर्द्रा नक्षत्रानेही पाठ फिरवली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतर पुनर्वसू नक्षत्रात चांगला पाऊस पडून भर निघेल असा अंदाज व्यक्त होत असतानाच ठरावीक भागातच त्याने हजेरी लावली. या नक्षत्रानेही निराशा केली. आता सोमवारपासून सुरू होणाऱ्या पुष्य नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पंचांगकर्त्यांनी या नक्षत्रात दि. २३ ते २९ जुलै या दरम्यान पाऊस जोर धरेल, असे म्हटले आहे. मात्र, त्यापुढील आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा नक्षत्रातही मध्यम व अल्प वृष्टीचे भाकीत वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या खरिपावर संकटाचे ढग घोंघावत आहेत.
इन्फो
पर्जन्यसूचक म्हैसही धोका देणार?
यंदा नक्षत्रांचे पर्जन्यसूचक वाहन केवळ आश्लेषा, उत्तरा आणि चित्रा या नक्षत्रांचे आहे. मात्र, मोर वाहनावर स्वार होऊन येणाऱ्या आश्लेषा नक्षत्रातही पाऊस लहरी असल्याचे म्हटले असून काही भागातच चांगल्या वृष्टीचे योग वर्तविले आहेत. म्हैस वाहनावर येणाऱ्या उत्तरा नक्षत्रात पाऊस मध्यम प्रमाणात होण्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याचबरोबर उष्णतामान वाढेल असेही म्हटले आहे. चित्रा नक्षत्राचे वाहनही मोर असले तरी या नक्षत्रातही काही भागात पाऊस ओढ धरणार असल्याचे म्हटले आहे. दरवर्षी म्हैस या वाहनावरील नक्षत्रात भरपूर पाऊस पडत असतो. यंदा मात्र म्हैस पाण्यात डुंबणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे.
फोटो- १६ नक्षत्र
160721\465516nsk_34_16072021_13.jpg
फोटो- १६ नक्षत्र