नाशिक : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या संदर्भात काढलेल्या कथित उद्गाराबद्दल बुधवारी (दि. ३१) शहरात आयोजित एका कार्यक्रमात चांगलाच सवाल-जबाब रंगला. उदयनराजे हे छत्रपतींचे वंशज असताना त्यांना राजे का नाही म्हणणार, असा प्रश्न करीत मुलांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी वागळे हे ठाम राहिले. काही युवकांनी यावेळी घोषणाबाजीदेखील केली. शहरातील विधी महाविद्यालयात दुपारी हा प्रकार घडला. न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयात राज्यघटने संदर्भात एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात हा प्रकार घडला. काही दिवसांपूर्वीच वागळे यांनी, ‘आपण उदयन भोसले यांना राजे संबोधणार नाही’ असे वक्तव्य केले होते. वागळे यांचे व्याख्यान सुरू झाल्यानंतर काही युवकांनी उदयनराजे यांच्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. मात्र, वागळे यांनी त्यावर उत्तर देण्यास नकार दिला. अभिनेता सैफ अली खान यांचा नवाब, तर अफजल गुरुचा सन्मानाने उल्लेख करता, मग उदयन यांच्याबाबत राजे असा उल्लेख का करत नाही, असा प्रश्न युवकांनी केला. मात्र, राजे का म्हणणार नाही याबाबत आपण अगोदरच संबंधित कार्यक्रमात स्पष्ट केले होते. माध्यमे तसेच आपल्या ब्लॉगवरूनही त्याचे उत्तर दिले असल्याने त्यावर आपण आता बोलणार नाही, कारण हे ते व्यासपीठ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु युवकांनी त्यांना वेळ देण्याची मागणी केली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतंत्र वेळ घ्या मगच चर्चा करू, असेही वागळे यांनी सांगितले. युवक ऐकत नसल्याचे बघून पोलिसांना बोलवावे लागेल असे वागळे यांनी सांगितल्यानंतर, ‘पोलिसांना येऊ द्या, ते कोणत्या कलमाने अटक करतात ते बघू,’ असे सांगून काही युवकांनी घोषणा दिल्या.