पाळे खुर्द : बेमोसमी पाऊसाने गारासह हजेरी लावल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी वादळी पावसाने काही घराची पडझड तर काहींच्या घरांचे छप्परच उडाले.
आदिवासी नागरिक नाना पुंडलिक मोहन यांच्या एकलहरे शिवारातील राहत्या घराचे छपरच वादळी वाऱ्याने उडून गेले. त्यामुळे घरातील सर्व वस्तूंचे बरेच नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच सुमारे दोन लाख रुपये मालकाकडून उचल घेत घर बांधले होते. त्याचे बरेच नुकसान झाले.पाळे खुर्द परिसरात आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. कधी नव्हे ते यंदा आंब्याच्या झाडांना भरपूर फळं आलेली होती, परंतु वादळी वारा आणि गारांचा पाऊस यामुळे कैऱ्या जमीनदोस्त झाल्या. झाडाखाली कैऱ्यांचासर्वत्र सडा पडला होता. त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याने शेतात पिकविलेला फळभाज्या व पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.