शहरात पावसाचा ‘वीकेण्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 01:46 AM2019-07-14T01:46:56+5:302019-07-14T01:48:01+5:30
शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून, मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला नसून शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली.
नाशिक : शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून, मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला नसून शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली. अर्धा ते पाऊणतास मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव झाल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते. गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटले असून, शनिवारीदेखील फारसा पाऊस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होऊ शकला नाही. धरणाचा जलसाठा २ हजार ८७६ दलघफूपर्यंत पोहचला असून, धरण ५१.०८ टक्के भरले आहे.
गेल्या रविवारी झालेल्या जोरदार पावसानंतर पुन्हा पावसाने दमदार ‘बॅटिंग’ केली नाही. बुधवारी (दि.१०) संततधार सुरू राहिल्याने १०.१ मिमीपर्यंत पाऊस दिवसभरात पडला होता. त्यानंतर पावसाने मात्र समाधानकारक हजेरी लावली नाही. शहरासह जिल्ह्यातदेखील पावसाने विश्रांती घेतली आहे.
शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजेपासून साडेपाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या हलक्या-मध्यम सरींच्या वर्षावामुळे चाकरमान्यांचे घरी परतताना हाल झाले. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांचीही तारांबळ उडाली. १.५ मि.मी.पर्यंत पावसाची नोंद होऊ शकली.
गंगापूर धरणक्षेत्रात शनिवारी पावसाने हजेरी लावली नाही. तसेच पाणलोट क्षेत्रातील कश्यपी परिसरात केवळ २ तर गौतमी, त्र्यंबकेश्वर भागात अनुक्रमे ५.७ मिमी इतका पाऊस पडला. अंबोलीमध्ये ११ मि.मीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकली. गंगापूर धरणात शनिवारी सायंकाळपर्यंत ६४ दलघफूपर्यंत नव्या स्वरूपात पाण्याची आवक झाली. कश्यपी धरण ३१.८५, गौतमी ३४.५८ टक्के इतके भरले आहे.