पावसाचा जोर ओसरला
By admin | Published: July 12, 2016 12:25 AM2016-07-12T00:25:00+5:302016-07-12T00:27:16+5:30
जनजीवन पूर्वपदावर : बारा तासांत १५.२ मि.मी.
नाशिक : सोमवारी (दि.११) पहाटेपासून संततधार सुरू होती; मात्र दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. बारा तासांमध्ये केवळ १५.२ मिलिमीटर पावसाची नोंद पेठरोडवरील हवामान खात्याने केली आहे. रविवारी जोरदार पावसाने गोदावरी दुथडी भरून वाहिली. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच गोदावरीला पूर आल्याचे नाशिककरांनी बघितले. सकाळी पावसाचे प्रमाण घटल्याने पूरही ओसरला. पूर ओसरताच गोदाकाठालगत व जुने नाशिक, पंचवटी भागांतील जनजीवन पूर्वपदावर आल्याचे चित्र पहावयास मिळाले. पूर ओसरला असला तरी नीळकंठेश्वर मंदिरापासून बालाजी मंदिरापर्यंत भरणारा बाजार बंदच राहिला. सोमवारी पावसाचा जोर ओसरल्याने गोदापात्रातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने पूर ओसरल्याचे चित्र होते. रोकडोबा मैदान, यशवंतराव महाराज पटांगणाच्या परिसरात नदीच्या पाण्यात नाशिककरांनी मनसोक्त ‘सेल्फी’ काढत आनंद लुटला. सोमवारी संध्याकाळी गाडगे महाराज पूल, नारोशंकर मंदिर, रोकडोबा पटांगण या भागात नाशिककरांनी गोदापात्र बघण्यासाठी गर्दी केली होती. शनिवारी व रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दोन वर्षांनंतर गोदावरीला पूर येऊन दुतोंड्या मारुतीही पाण्याखाली गेला होता. सोमवारी पावसाचा जोर कमी झाल्याने नदीच्या पाणीपातळीत घट होऊन पूर ओसरण्यास सुरुवात झाली होती.