राज ठाकरे नाशिककरांवर नाराज

By admin | Published: March 11, 2017 01:42 AM2017-03-11T01:42:40+5:302017-03-11T01:42:56+5:30

नाशिक : नाशिकमध्ये आपण विकासकामे केली हीच मोठी चूक झाली, असे उपहासपूर्ण विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुरुवारी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.

Raj Thackeray angry at Nashikkar | राज ठाकरे नाशिककरांवर नाराज

राज ठाकरे नाशिककरांवर नाराज

Next

 नाशिक : नाशिकमध्ये आपण विकासकामे केली हीच मोठी चूक झाली, असे उपहासपूर्ण विधान करत यापुढे लोकांना जे हवे त्याचा पुरवठा करणारे उद्वेगजनक भाव मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुरुवारी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात बोलताना व्यक्त केल्याने मनसेच्या नाशिकमधील वाटचालीबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. कामे करूनही मते न मिळाल्याने नाशिककरांवर राज नाराज झाल्याने मनसेने साकारलेल्या प्रकल्पांच्या भवितव्याबाबतही चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात एकूणच निकालावर भाष्य केले. राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत ठिकठिकाणी घेतलेल्या जाहीर सभांमध्ये नाशिकमधील मनसेच्या प्रकल्पांचे सादरीकरण करत विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडे मते मागितली होती. राज यांच्या या प्रचाराची चांगली हवाही तयार झाली होती. परंतु, प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीत मनसेला मागील निवडणुकांच्या तुलनेत जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले. नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेने ९७ उमेदवार रिंगणात उतरविले होते. मात्र, केवळ ५ उमेदवारांनाच विजयाला गवसणी घालता आली. नाशिकप्रमाणेच मुंबई, पुणे, ठाणे याठिकाणीही मनसेला झटका बसत संख्याबळ
घटले.
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाच्या अकराव्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात प्रथमच राज ठाकरे यांनी छोटेखानी भाषण करताना पराभवाचे धक्कादायक विश्लेषण केले आणि पक्षाची आगामी वाटचाल कोणत्या पाऊलवाटेवरून असेल, याचे संकेतही दिले. मात्र, ज्या शहरात विकासाचे प्रकल्प राबविले तेथील मतदारांनी नाकारल्याने राज नाराज झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात मनसेने साकारलेले बॉटनिकल गार्डन, इतिहास वस्तू संग्रहालय, वॉटर कर्टन, उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण, शंभर फुटी कारंजा या प्रकल्पांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पांची पक्षाकडून काळजी वाहिली जाईल की नाही, याबाबत तर्कवितर्कला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Raj Thackeray angry at Nashikkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.