नाशिक- लोकांच्या संगणक, फोन व मोबाईलवर पाळत ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारला खड्यात घालणारा निर्णय आहे. पाच राज्यातील निवडणूकीतील निकालानंतर आता जशजशा निवडणूका जवळ येतील तशा हे सरकार चुका करतील, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक मध्ये शनिवारी (दि.२२) शासकिय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले पाच राज्यातील निवडणूकीतील निकाल हे तेथील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लोकांचा रोष आहे. आता निवडणूका जवळ येतील तसे हे सरकार चुका करत जाईल. इंटरनेट आणि मोबाईल म्हणजे फटीतून घरात शिरण्याचा प्रकार आहे. अशाप्रकारे तपासणी केलीच तर मोदी सरकारला लोकांनी शिव्या दिल्याचेच सापडेल असेही ते म्हणाले.नोटाबंदीचा निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेऊन स्वत: साठी खड्डा खोदल्याची माझी पहिली प्रतिक्रीया होती असे इतका वाईट निर्णय बसपाच्या अध्यक्षा मायावती देखील घेणार नाहीत, असेही ते म्हणाले.राज्यातील भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात वाद करून बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत राहतात, परंतु त्याचा आता उपयोग नाही असे सांगत त्यांनी पाच राज्यातील सरकारपेक्षा महाराष्टÑात बत्तर हाल होतील असे ते म्हणाले.
शिवसेनेला राम आठवला आणि आता हनुमानाच्या जातीचा वाद सुरू आहे, या विषयावर राज यांनी आज सकाळीच कोणीतरी हनुमान चिनी होता असं म्हंटल्याचे ऐकलं. हनुमान उडत असल्याने तो अनेक देशांवरून उडत गेला असेल असे सांगत हे काय राजकारण्यांचे विषय झाले का असा प्रश्न केला आणि देशातील मुळ प्रश्न भरकटविण्यासाठीच अशा चर्चा सुरू केल्या जातात.
आगामी निवडणूकीत मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षांकडे कोण आहे या प्रश्नावर त्यांनी देशाचा इतिहास मांडून यापूर्वी तरी विरोधी पक्षांकडे पर्याय कधी होता असा प्रश्न केला. निवडणूका विरोधी पक्ष जिंकत नाही तर सरकार हारते याकडे लक्ष वेधत त्यांनी पंडित नेहेरूपांसून मोंदी पर्यंत लोकांनी पर्याय म्हणून दिले नव्हते चुकीच्या कामगिरीमुळे सरकार गेले. मनमोहन सिंग यांच्या सरकारविषयी नाराजी असल्याने नरेंद्र मोदी यांना संधी मिळाली त्यांच्या जागी लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी वा अन्य कोणी असते तर त्यांना ही संधी मिळाली असते.