नाशिक : मुंबई येथून दिल्लीसाठी पश्चिम रेल्वेमार्गावरून धावणारी राजधानी एक्स्प्रेसमध्य रेल्वे मार्गे दिल्लीकडे जावी, या मागणीला सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. या संदर्भातील अध्यादेश जारी होताच राजधानी एक्स्प्रेस मुंबई-विरार मार्गे गुजरातकडे न जाता ती मुंबई-कल्याण-ठाणे- इगतपुरी-नाशिकरोड-मनमाड-जळगाव-भुसावळ मार्गे दिल्लीकडे धावेल. त्याचा दिल्ली प्रवास करणाऱ्या उत्तर महाराष्टÑातील प्रवाशांना व उद्योग, व्यवसायाला फायदा होणार आहे.नाशिक-अहमदनगर-औरंगाबाद-जळगाव-भुसावळ-धुळे येथील रेल्वे प्रवाशांना दिल्ली येथे जाण्यासाठी मुंबई येथून राजधानी पकडावी लागते. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होते. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईहून दिल्लीला जाणारी अतिवेगवान राजधानी एक्स्प्रेस पश्चिम मार्गाऐवजी मध्यमार्गावरून धावावी यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते.या संदर्भात त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच पीयूष गोयल यांची भेट घेऊन राजधानी एक्स्प्रेस मध्य रेल्वे मार्गावरून सुरू करणे किती गरजेचे आहे तसेच दिल्लीला जाण्यासाठी अतिवेगवान रेल्वे गाड्या उपलब्ध नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते.गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाकडून सदरचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयात मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. सोमवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी करून मंजूर केला. या विषयीचा अध्यादेश काही दिवसातच निर्गमित होणार आहे.
राजधानी एक्स्प्रेस नाशिकमार्गे धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 1:29 AM