शहरात रमजान ईद उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 12:29 AM2021-05-15T00:29:48+5:302021-05-15T00:30:23+5:30
इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) शुक्रवारी (दि.१४) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीही शहरातील शहाजहांनी ईदगाहवर सामूहिक नमाज पठणाचा सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे मैदानावर शुकशुकाट पसरलेला पहावयास मिळाला.
नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) शुक्रवारी (दि.१४) शहरासह जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शासनाच्या नियमांचे पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीही शहरातील शहाजहांनी ईदगाहवर सामूहिक नमाज पठणाचा सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे मैदानावर शुकशुकाट पसरलेला पहावयास मिळाला.
मुस्लीम बांधवांनी रमजान पर्वचे तीस निर्जळी उपवास गुरुवारी पूर्ण केले. संपूर्ण महिना धार्मिक कार्यासाठी समाजबांधवांनी वाहून दिलेला होता. अधिकाधिक वेळ अल्लाच्या उपासनेसाठी (ईबादत) देण्याचा प्रयत्न केला जात होता. गुरुवारी चंद्रदर्शन घडले आणि चालू इस्लामी महिना रमजानची सांगता होऊन ‘’शव्वाल’’ महिन्याला प्रारंभ झाला. या इस्लामी महिन्याच्या १ तारखेला शुक्रवारी सकाळी ईद साजरी करण्यात आली. पहाटेपासून मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये ईदची लगबग दिसून येत होती. नागरिकांनी पहाट उजाडताच दूध खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरातील जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव, देवळालीगाव, विहितगाव आदी भागांत मशिदीबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा ईदचे नमाजपठण मशिदींमधूनदेखील होऊ शकले नाही यामुळे समाजबांधवांचा काहीसा हिरमोड झाला. आबालवृद्धांनी घरच्या घरीच फातिहापठण व नमाजपठण केले. बाजारपेठा बंद राहिल्याने बहुतांश नागरिकांनी यंदा ईदची खरेदी केली नाही.
शिरखुर्म्याचा दरवळला खमंग सुगंध
रमजान ईदचे ‘’शिरखुर्मा’’ हे खाद्यपदार्थ विशेष आकर्षण असते. दूध आणि सुकामेवा एकत्र करुन तयार केले जाणाऱ्या या खाद्यपदार्थाचा तसेच शेवयांचा सुगंध शुक्रवारी सकाळी मुस्लीबहुल भागात दरवळलेला जाणवला. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवाराचे शिरखुर्मा देऊन तोंड गोड करण्यात येते.
‘जुमा’चे
नमाजपठणही घरी
कोरोनामुळे मशिदींमध्ये सामुदायिक नमाजपठण बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे गेल्या संपूर्ण रमजान पर्वात समाजबांधवांनी ‘’जुमा’’ अर्थात शुक्रवारची विशेष नमाज
घरीच अदा केली. शहरातील बहुतेक मशिदींच्या द्वारावर ‘’मस्जिद बंद हैं’’ असे फलक वाचावयास
मिळाले.
सोशल मीडियावर
‘ईद मुबारक’चा वर्षाव
गुरुवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडल्यापासून तर शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. एकापेक्षा एक सरस वॉलपेपर्स, चित्रफितींद्वारे ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली जात होती. एकूणच शुभेच्छांच्या संदेशांची गर्दी व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर दिसून आली.