नाशिक : मुलांची वाढ ही शारिरीक, मानसिक, बौद्धीकदृष्ट्या होत असते. अशाप्रकारे मुलांची सर्वांगीन वाढ होण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते. पोषक अन्न, पाणी, पुरेशी झोप यामुळे मुलांची योग्य वाढ होते. पालकांनी मुलांना नेहमी उपदेश न करत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. सुसंवादातूनच मुलांवर नितीमूल्याचे संस्कार घडवले तर आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करतानाच आनंददायी शिक्षणातूनच ज्ञानाधिष्ठित समाजाची उभारणी होईल, असे प्रतिपादन ग्राममंगल व महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे संस्थापक बाल शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी येथे केले. इस्पॅलियर एक्सपेरिमेंटल स्कूलतर्फे े त्रिमूर्ती चौक येथील शाळेमध्ये बाल शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी ‘मुलांकडे कसं पाहाव’ याविषयावर पालकांशी संवाद साधला. सोशल मिडीयाच्या युगात मुलांचे संगोपन करताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून मुलांवर संस्कार घडवतानाही पालकांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर पालकांना मार्गदर्शन करताना ‘मुलांकडे कसं पाहावं’ याविषयावर बोलताना पानसे यांनी मुलांशी रागाने न बोलता मधूर आवाजात संवाद साधण्याचे आवाहन केले. पालकांनी मुलांमध्ये शिस्त आणि जबाबदारी यांचे मूल्य लहान वयातच रुजवले पाहिजे. आरोग्याकडे लक्ष देऊन सुदृढ पिढी घडविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षण हे कंटाळवाणे न होता आनंददायी व्हायला हवे, असेही ते म्हणाले. यावेळी इस्पॅलियर स्कूलचे प्रमुख सचिन जोशी, डॉ. प्राजक्ता जोशी, मुख्याध्यापक अंकिता कुरिया यांसह पालक उपस्थित होते.