नांदूरवैद्य : राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवऱ्हे कौटी फाटा येथे विनामास्क व विनाकारण बाहेर फिरत असलेल्या नागरिकांची ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली असून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोरपगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जात असल्याचे वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माळी यांनी सांगितले.नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरून विनाकारण बाहेर पडत असलेल्या व्यक्तींवर वाडीवऱ्हे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. प्रवासाचा पास असेल तर आणि तरच घराबाहेर पडा. महामार्गावरून विनाकारण भटकत असल्याचे वाडीवऱ्हे पोलिसांच्या निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासह कोविड अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्यास तातडीने इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन केले जात आहे. वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकासह ही मोहीम सुरू केली आहे.-----------------------पथकाकडून मोहीमकोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हाभर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. वैध कारण असेल अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठीचा ई-पास काढला असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडणे आवश्यक आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश अहिरे, राजेंद्र कचरे, पोलीस हवालदार भाऊसाहेब भगत, पोलीस शिपाई सोमनाथ बोराडे, होमगार्ड त्र्यंबक, पेठ पथक यांच्याकडून कार्यवाही केली जात आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲन्टिजन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 2:35 PM