नाशिक : बाहेर पावसाचा गारवा आणि कलारंगच्या मैफलीत मारवा, असा सुरेख संगम अनुभवायला भाग्य लागते. जनस्थान कलारंगच्या या आठवड्याच्या मैफलीत सुप्रसिद्ध बासरीवादक मोहन उपासनी यांच्या बासरीच्या सुरांनी मनाला भुरळ घातली व नामवंत संगीतकार, व्हायोलिन वादक अनिल दैठणकर यांच्या व्हायोलिनने रसिकांना आनंदाची अनोखी पर्वणी दिली.
बाहेरच्या वातावरणाने होरपळलेल्या मनाला या सुरेख ऑनलाईन संगीत मेजवानीने दिलासा मिळाला. मैफलीचा शुभारंभ प्रसिद्ध बासरीवादक मोहन उपासनी यांनी केला. संध्याकाळच्या कातरवेळी तुही रे, अजीब दास्ताँ है ये, ये शाम मस्तानी, रोजा जानेमन या गाण्यांनी रसिकांची संध्याकाळ संस्मरणीय झाली, तर बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद देण्यासाठी मोहन उपासनींनी रिमझिम गिरे सावन, मेरे नयना सावन भादो ही गाणी बासरीतून थेट रसिकांच्या मनात पोहोचवली. त्यानंतर संगीतकार आणि व्हायोलिन वादक अनिल दैठणकर यांनीही रसिकांना तृप्त केलं. होशवालों को खबर क्या, तुझसे नाराज नहीं जिंदगी, लग जा गले, यू हसरतों के दाग या गाण्यांना एकत्र गुंफून त्यांनी रसिकांची भरभरून दाद मिळविली. एकापाठोपाठ शुक्रतारा मंद वारा, एक प्यार का नगमा हैं, जाने कहा गये वो दिन या गाण्यांनी रसिकांना मोहिनी घातली. या मैफलीची सांगता भैरवी रागाच्या सुरावटीमधील धून वाजवून करण्यात आली. बाहेर पडणाऱ्या पावसाचा गारवा आणि मैफलीतील मारवा मनात घोळवणारी मैफल रसिकांसाठी संस्मरणीय ठरली.
फोटो ०५ उपासनी, ०५ दैठणकर