नाशिक : बहुचर्चित वैभव कटारे खून प्रकरणात टाडा अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजेवर गेलेला कैदी रवींद्र मोगल पांडे गेल्या २३ वर्षांपासून फरार झाला होता. त्याला नाशिक पोलिसांच्या गुन्हेशाखा विभागातील युनिट दोनच्या पथकाने अहमदाबाद जिल्ह्यातील दशकोळी तालुक्यात कुआ येथून अटक केली आहे.
नाशिकरोडच्या बिटको भागातून १५ सप्टेंबर १९९२ रोजी कांतीलाल कटारे, (रा. बिटको हॉस्पिटल समोर, नाशिकरोड) या व्यापाऱ्याचा नातु वैभव कटारे याचे २ लाख रुपयांच्या खंडणीसाठी बिरजु गिज, रवींद्र पांडे यांच्या टोळीने अपहरण करीत खंडणीची रक्कम मिळेपर्यंत त्याला अमानुष मारहाण केल्यामुळे वैभव कटारेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात टाडा कायद्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने गुन्हयातील ५ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यातील रवींद्र मोगल पांडे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असतांना तो १८ फेब्रुवारी १९९८ रोजी १४ दिवसासाठी संचित रजेवर गेलाहोता. परंतु तो कारागृहात परतलाच नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठात्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यासह शहरात फरार आरोपींच्या शोधाची मोहीम सुरू असताना गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शामराव भोसले यांना पांडे अहमदाबाद येथे नाव बदलून राहत असल्याचा सुगावा लागला होता. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, शामराव भोसले, पोलीस हवालदार शंकर काळे, पोलीस नाईक नंदकुमार नांदुरडीकर यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील दशकोळी तालुक्यात सलग दोन दिवस शोध घेत पांडे कुआ येथून अटक केली. प्राथमिक चौकशीत त्याने त्याचे नाव राजुभाई रामदास जाधव ऊर्फ फौजी असल्याचे सांगितले. परंतु पोलिसांच्या चौकशीसमोर त्याचे सत्य उघड झाल्याने त्याने तो राजूभाई रामदास जाधव म्हणजेच रवींद्र मोगल पांडे असल्याचे कबुल केले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गुजरात येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात हजर केले आहे.