नाशिक : नाशिकचे पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सिंघल यांची बदली महत्त्वाची मानली जात असून, मंगळवारी ते पदभार स्वीकारतील. गेल्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जगन्नाथन यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या महिन्यातच त्यांना अपर पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आल्याने त्यांच्या बदलीची चर्चा होऊन नाशिकच्या पोलीस आयुक्तपदासाठी अनेकांची नावे चर्चिली गेली. त्यात रवींद्र सिंघल यांनी बाजी मारली. सध्या सिंघल हे मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) या पदावर आहेत. त्यांच्या जागेवरच अपर महासंचालक म्हणून जगन्नाथन यांची बदली करण्यात आली आहे. सिंघल यांची भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्यानंतर नाशिक जिल्ह्णातील मालेगाव येथे अपर अधीक्षक येथे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले, त्यानंतर नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी तीन वर्षे कामकाज पाहिले. मुंबईत रेल्वे पोलीस आयुक्तम्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. तथापि, कुंभमेळ्याच्या त्यांचा अनुभव लक्षात घेता, गेल्या वर्षी नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या पर्वणीसाठी राज्य शासनाने त्यांची खास नाशिकला तात्पुरती बदली केली होती. त्यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच, गर्दीवरील नियंत्रण मिळविण्यात सिंघल यशस्वी झाले. नाशिक शहरात सध्या वाढलेले गुन्हे व गुन्हेगारी कारवाया पाहता तसेच आगामी महापालिका निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी शासनाने सिंघल यांची नाशिकला बदली केली आहे.
रवींद्र सिंघल नवे पोलीस आयुक्त
By admin | Published: August 22, 2016 11:37 PM