नाशिक : इंग्लंडमधून गेल्या २५ नोव्हेंबरपासून वेळोवेळी आलेल्या ४८ नागरिकांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे घरी क्वारंटाइन असणाऱ्यांना पुन्हा तपासणीसाठी जावे लागणार आहे.
इंग्लंडमध्ये नव्या स्वरूपाचा कोरोना विषाणू आल्याने जग धास्तावले आहे. त्यामुळे इंग्लंडमधून आलेल्यांची विशेष दक्षता घेतली जात आहे. नाशिकमध्ये २५ नोव्हेंबरपासून वेळोवेळी ४८ नागरिक दाखल झाले आहेत. नियमानुसार त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानेच ते शासन नियमानुसार घरी आहेत. मात्र गुरुवारी (दि. २४) राज्य शासनाने महापालिकेला या सर्वांची चाचणी करण्याचे आणि संशयित असतील तर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कक्षात ठेवलेल्या रुग्णांची कोराेना चाचणी करण्यात येणार आहे. परंतु त्याच बरोबर १४ दिवसानंतर पुन्हा चाचणी आणि ते निगेटिव्ह निघाल्यास पुन्हा एकदा २४ तासात चाचणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शासनाने या ४८ प्रवाशांची यादीही पुन्हा पाठवली आहे.
नाशिक शहरात दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी ती अजूनही नियंत्रणात आहे. त्यातच आता नवीन विषाणूंची सुरुवात झाल्याने पुन्हा धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.