नाशिक : माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना पकडल्यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. आता जिल्ह्यातील शिक्षण विभागावर लागलेला हा भ्रष्टाचाराचा डाग पुसण्यासाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ सरसावला असून, संघटनेचे कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांच्या प्रतिनिधी व नेत्यांनी यापुढे शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाऱ्यास भेटण्यास जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यांना पूर्णविराम मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत.
शिक्षण क्षेत्रात शिक्षक व मुख्याध्यापकांच्या अनेक संघटना कार्यरत असून, यातील काही नेते मंडळी व संघटनांचे पदाधिकारी कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने वेगवेगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन खूश ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. या भेटींचा असे चमको नेते त्यांच्या स्वत:च्या प्रसिद्धीसाठी पुरेपूर वापर करून घेतात. मात्र नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने याविरोधात भूमिका स्पष्ट करीत अशा प्रकारच्या सत्कार सोहळ्यांना आवर घालण्याचे आवाहन केले आहे. अधिकारी काम करतात. त्या कामाच्या संदर्भात त्यांना वेतन दिले जाते. त्याचप्रमाणे शिक्षकांनाही अध्यापनाच्या कामाचे वेतन मिळते. त्यामुळे शिक्षक अथवा शिक्षक नेत्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा सत्कार करायला जाऊ नये, शाळेला भेट देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यास हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
--
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे सर्व शिक्षक संघटना व त्यांचे पदाधिकारी व शिक्षक नेते यांनी यापुढे शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याचा सत्कार करण्यासाठी हार, गुच्छ, शाल घेऊन जाऊ नये. अशा प्रकारे सत्कार करायला जाऊन अधिकारी जवळचे असल्याचे दाखवणाऱ्यांकडे साशंकतेच्या नजरेतून पाहिले जाईल, याची जाणीव राखणे आवश्यक आहे.
- एस. बी. शिरसाठ, कार्याध्यक्ष, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ.