खेडलेझुंगे : दोन महिन्यांपासून कांद्याचे दर चढत्या दराने टिकून असल्याने कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.निफाड तालुक्यातील रुई, धानोरा, कोळगाव, खेडलेझुंगे, धरणगाव, सारोळेथडी आदी भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिना उजाडला तरी कांदा लागवड सुरू असल्याचे चित्र आहे.आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याची रोपे खराब होऊन सडून गेली होती. अवकाळी पावसाने एकदा नव्हे, तब्बल तीनदा टाकलेली रोपे सडली. सध्या कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी कांदा लागवड न करता रोपे महागड्या दराने विकून आर्थिक प्राप्ती करून घेत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस आणि टिकून असलेल्या बाजारभावामुळे कांदा लागवडीवर शेतकरीवर्गाने अधिक भर दिला आहे.एकीकडे घरची रोपे सडून गेली तर दुसरीकडे बाजार समितीत कांद्याचे दर गगनाला भिडत असल्याने महागड्या किमतीने का होईना मिळेल तेथून रोपे आणून लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. महिनाभरापासून निफाड तालुक्यातील सर्वच भागात वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी ढगाळ तर कधी कडक ऊन, पहाटे धुके, रात्री वाहणारे थंड वारे यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वातावरण बदलामुळे कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा लागवड धोक्यात आली असून, लागवड केलेल्या कांद्याचे शेंडे पिवळे पडत असल्याने सातत्याने औषध फवारणी करावी लागत आहे.मजुरांची टंचाईखेडलेझुंगे, रुई-धानोरे, धारणगाव, कोळगाव, कानळद आदी भागात कांदा लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने विकत आणलेली रोपे खराब होत चालली आहे. सर्वत्र कांदा लागवड सुरू असल्याने मजुरीचे दरही वाढलेले आहेत. सध्या कांदा लागवडीचा एकरी दर नऊ ते अकरा हजारांपर्यंत पोहोचला आहे. ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी शेतकरी जादा पैसे देऊन मजूर आयात करताना दिसत आहे.पूर्वी कांद्यावर कोणताही रोग येत नव्हता, परंतु सततच्या वातावरणातील बदलामुळे कांद्यावरही रोगराई वाढली आहे. त्यामुळे खर्चातही वाढ झालेली आहे. वाढलेला खर्चाचा आकडा बघता कांद्याचे वाढलेले दर फायद्याचे दिसून येत नाही. कारण वाढलेला उत्पादन खर्च आणि विक्र ी दर यामुळे उत्पन्नाची सरासरी सारखीच येत आहे.- प्रमोद गिते, कांदा उत्पादक
कांद्याची विक्रमी लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 10:00 PM
दोन महिन्यांपासून कांद्याचे दर चढत्या दराने टिकून असल्याने कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.
ठळक मुद्देशेतकरी व्यस्त। ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव