जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून जिल्हा प्रशासनाने १३ एप्रिल रोजी आदेश काढून उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. ऑक्सिजनअभावी गेले दोन महिने काही उद्योग बंद पडले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने आणि दुसरीकडे ऑक्सिजनचे उत्पादनही वाढले आहे. द्रवरूप ऑक्सिजनही मुबलक उपलब्ध होत आहे. त्यामुळे १ जून रोजी केंद्र सरकारने आदेश काढून रुग्ण स्थितीचा आढावा घेऊन औद्योगिक कारणांसाठी ऑक्सिजन पुरविण्याबाबत राज्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन अतिरिक्त ऑक्सिजन उद्योगांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजनचे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर त्यातील २० टक्के ऑक्सिजन उद्योगांना पुरविण्यात येणार आहे. उर्वरित ८० टक्के किंवा गरज पडल्यास त्यापेक्षा वैद्यकीय कारणांसाठी वापरण्यात येणार आहे. आता ऑक्सिजनअभावी बंद पडलेल्या उद्योगांना दिलासा मिळाला आहे.
इन्फो ===
जिल्ह्यातील जवळपास १२० उद्योगांनी ऑक्सिजनची मागणी नोंदविली होती. राज्य सरकारच्या आदेशानुसार कायम प्रक्रिया उद्योग, फॅब्रिकेशन उद्योग, फर्नेस, रिफायनरी, स्टील उद्योग, ॲल्युमिनिअम कॉपर प्रोसेसिंग प्लांट यासह पायाभूत सुविधा प्रकल्प मध्यम उद्योग, निर्यातदार, अन्न प्रक्रिया उद्योग यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये तूर्त ७० ते ८० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे.