नाशिक : काही दिवसांपूर्वी पंचवटीतील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा असाच एक प्रकार गंगापूररोडला उघडकीस आला असून एका खासगी रुग्णालयाच्या मदतनीस व वॉर्ड बॉयला पोलिसांनी रेमडेसिविर चोरीप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.
गंगापूर रोडवरील एका रुग्णालयातून पीपीई किट्स घालून चोरी करणाऱ्या तिघा संशयितांनाना गंगापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रुग्णाच्या नावे असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे काचेच्या सीलबंद बाटल्यांचे दोन बॉक्सही जप्त केले आहे. या रेमडेसिविर चोरी कांडमध्ये रुग्णालयातील मदतनीस आणि वॉर्डबॉयचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी विकी वरखडे, मदतनीस सागर सुनील मुटेकर, वॉर्डबॉय गणेश गंगाधर बत्तीसे यांना शिताफीने अटक केली आहे.
शनिवारी रात्री (दि.१७) रात्री पावणेदहा वाजता रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरच्या कोविड वॉर्डमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण उपचारार्थ दाखल झाला. त्यास रेमडेसिविर इंजेक्शनचा पहिला डोस देण्यासाठी दोन रेमडेसिविर इंजेक्शन नर्सिंग काऊंटरवर औषधांच्या बॉक्समध्ये ठेवले होते. त्याचवेळी अनोळखी दोघे इसम पीपीई किट्स घालून तिसऱ्या मजल्यावर आले. त्यातील एकाने कोरोना वॉर्डात प्रवेश करून काऊंटरवरच्या औषधांच्या बॉक्समधील रेमडेसिवीर इंजेक्शन हातोहात गायब केले. त्यांचा हा प्रताप रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
याप्रकरणी रुग्णालयाच्या महिला प्रशासन अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीची पाहणी करून पीपीई किट घालून रुग्णालयातील कर्मचाऱ्याने चोरी केल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी तपासाला गती दिली. सहायक निरीक्षक प्रवीण सुर्यवंशी यांच्या गुन्हे शोध पथकाने काही तासांत या चोरीचा पर्दाफाश केला. गोपनीय चौकशीतून या चोरीचा म्होरक्या विकी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्यासह रुगणलायच्या कर्मचाऱ्यांच्या मुसक्या बांधल्या. चौकशीत त्याने दोघा कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेमडेसिवविर इंजेक्शन चोरी केल्याची कबुली दिली.
----इन्फो-----
कोरोनाचा फैलाव अन् रेमडेसिविरचे ‘ब्लॅक’ तेजीत
एकीकडे कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून प्रशासकीय यंत्रणा चिंतेत सापडली आहे तर दुसरीकडे रेमडेसिविरचा काळाबाजार शहरात तेजीत येऊ लागल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय पेशातील व्यक्तींकडून अशाप्रकारे कोरोना आजारात अनेकदा उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याचे आतापर्यंतच्या घटनांवरून स्पष्ट होते. गरजूंना इंजेक्शन मिळत नसून सर्वत्र तुटवडा भासू लागला आहे.
-----
१० हजार ८०० रुपयांचे इंजेक्शन जप्त
तिघा चोरट्यांकडून पोलिसांनी १० हजार ८०० रुपये किमतीचे इंजेक्शनच्या बाटल्यांचे दोन बॉक्स हस्तगत केले आहे.