लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर ते दहेगाव या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. दूरवस्था झालेल्या या रस्त्यावर अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत.दहेगाव व वागळुद या दोन्ही गावांना लखमापूर व तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी लखमापूर-दहेगाव रस्ता अत्यंत महत्त्वाचा व सोयीचा मानला जातो. या दोन्ही गावांमध्ये दवाखाना व माध्यमिक विद्यालय नसल्याने या दोन्ही गावांतील प्रवाशी ,विद्यार्थी या रस्त्याने नेहमी ये-जा करीत असतात.
या भागातील एखाद्या रुग्णाला तातडीची वैद्यकीय मदत हवी असेल त्यावेळी या रस्त्याने जातांना दहेगाव व वागळुद येथील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्ता अत्यंत खराब असल्याने लवकर वाहने मिळत नाही. परिणामी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.
तसेच लखमापूरकडे येण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने हा रस्ता दहेगाव व वागळूद येथील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने हा सोयीचा रस्ता आहे. या रस्त्याला अनेक दिवसांपासून खड्ड्यांचे ग्रहण लागल्याने प्रवाशात संताप व्यक्त होत आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी सदर रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.बसच्या फेऱ्याही झाल्या बंदअगोदर या गावांमध्ये फेरा बस येत होती. परंतु खराब रस्त्यामूळे ती बस येत नाही. या रस्त्यावर काही ठिकाणी खडी येऊन पडली आहे. परंतु ती रस्त्यावर टाकण्यासाठी मुहूर्त मिळत नसल्याने या रस्त्याचे रस्ता पणच निघून गेले आहे. या रस्त्याने रात्री बेरात्री विविध कामगार येत असतात. तसेच या भागात बिबट्यांची मोठी दहशत असल्यामुळे रात्रीच्या वेळी खराब रस्त्याने जातांना जीव मुठीत घेऊन वाटचाल करावी लागते.