रहिवाशांनी केला रेव्ह पार्टीचा पर्दाफाश
By admin | Published: October 11, 2014 10:43 PM2014-10-11T22:43:25+5:302014-10-11T22:43:25+5:30
रहिवाशांनी केला रेव्ह पार्टीचा पर्दाफाश
नाशिक, दि. ११ - शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा रहिवाशांच्या सतर्कतमुळे पर्दाफाश करण्यात आला. मात्र पोलिसांनी या संपुर्ण प्रकाराकडे कानाडोळा केल्याने तासाभरातच रेव्ह पार्टीत पकडलेल्या सर्व तरुणांना क्लिनचिट देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून सर्रासपणे या फ्लॅटमध्ये रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात होते. दारू, गांज्या, चरस आदींचे या तरुणांकडून सेवन केले जात असल्याचा रहिवाशांचे म्हणणे आहे.
फ्लॅट मालकाला बजावली नोटीस
गंगापूर पोलिसांनी सर्व तरुणांना पोलीस ठाण्यात हजर केले असता, त्यांच्याकडून पुरेशी माहिती प्राप्त झाली नसल्याने त्यांना क्लिनचिट दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र याप्रकरणी फ्लॅट मालकाला नोटीस बजावण्यात आली असून, दोन-तीन दिवसात त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच सर्व तरुणांना तातडीने फ्लॅट खाली करण्याचेही पोलिसांकडून आदेश देण्यात आले.
फरार तरुणींबाबत पोलीस अनभिज्ञ?
रेव्ह पार्टीच्या ठिकाणी पोलीस येत असल्याची भनक तरुणींना लागल्यानंतर त्यांनी लगेचच घटनास्थळाहून पळ काढला. पोलिसांनी देखील त्या तरुणींबाबत चौकशी करण्याची तसदी घेतली नसल्याने यामध्ये काही तरी गोलमाल असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान यापूर्वी देखील काही तरुणी या तरुणांसमवेत फ्लॅटवर येत असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांची ही भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे.
असा केला पर्दाफाश
गंगापूर रोड परिसरात पाच कॉलेज तरुण एका भाडेतत्त्वावर घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. हे सर्व तरुण शहरातील एका महाविद्यालयांमध्ये शिकत असून, उच्चभ्रु कुटूंबातील असल्याचे समजते. या तरुणांकडे दररोज त्यांच्या मित्र-मैत्रिणींचे येणे जाणे असायचे. परंतु त्यांच्याकडे येणारे सर्व विद्यार्थीच असल्याने रहिवाशी याकडे दुर्लक्ष करीत असत. मात्र गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या तरुणांची संख्या वाढल्याने याठिकाणी काही तरी अनुचित प्रकार घडत असल्याचा रहिवाशांना संशय आला. त्यांनी याबाबत तरुणांशी चर्चा करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र तरुणांकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने रहिवाशांचे संशय आणखी गडद होत गेला. त्यावर काल (दि.१०) रात्री आठ, साडेआठ वाजेच्या सुमारास सात ते आठ तरुण-तरुणी मद्यपान करून फ्लॅटमध्ये गोंधळ करीत असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची संपुर्ण माहिती तत्काळ गंगापुर पोलिसांना कळविली. पोलीस घटनास्थळी येत असल्याचे तरुणांच्या लक्षात आल्यानंतर बाहेरून आलेल्या दोघा तरुणींनी लगेचच तेथून पळ काढला. मात्र पाच तरुणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी सर्व तरुणांना पोलीस ठाण्यात आणले असता, त्यांची तासभर कसुन चौकशी केली. परंतु पुरेशी माहिती मिळाली नसल्याचे कारण देत सर्व तरुणांना तासाभरातच क्लिनचिट दिल्याचे रहिवाशांनी सांगितले.
रहिवाशी व पोलिसांमध्ये असमन्वय
रेव्ह पार्टीच्या ठिकाणी गांज्या तसेच दारूच्या बाटल्या आढळल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगितले जात असताना, पोलिसांनी मात्र काहीच आढळले नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकरराव काळे यांना विचारले असता, त्यांनी सर्व तरुण-तरुणी प्रोजेक्ट करण्यासाठी जमले होते. अभ्यासानिमित्त सर्व तरुण एकत्र आले होते. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे अमली पदार्थ आढळून आले नाहीत.
पोलीस मॅनेज झाले
गंगापूर पोलीसांनी रेव्ह पार्टी करताना पकडलेल्या सर्व तरुणांना तासाभरातच सोडून दिल्याने पोलीस मॅनेज झाल्याचा संशय आहे. सर्व तरुणांवर गुन्हे दाखल करावेत असा आमचा मुळीच हेतु नाही. परंतु याप्रकरणी पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी करणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता प्रकरण दडपण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर परिसरातील नागरिकांनी
रहिवाशांचा अतिरेक
रहिवाशांकडून रेव्ह पार्टीचा आरोप केला जात असून, यामध्ये काहीच तथ्य नाही. रहिवाशांकडून अतिरेक केला जात असून, सर्व विद्यार्थी असल्याने किरकोळ प्रमाणात त्यांच्याकडून गोंधळ होण्याची शक्यता आहे. मात्र याचा अर्थ ते तरुण रेव्ह पार्टी करीत होते, असा होत नाही. सर्व तरुणांच्या पालकांना याबाबत समज देण्यात आली असून, रहिवाशांना समजवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- शंकर काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर पोलीस ठाणे