कोरोनासारख्या महामारी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधन होणे गरजेचे- भगतसिंह कोश्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 02:47 AM2020-11-04T02:47:33+5:302020-11-04T06:24:29+5:30
Bhagat Singh Koshyari : विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकृत मुख्य प्रशासकीय इमारतीचे तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झाले.
नाशिक : कोरोना महामारीच्या काळात आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित झालेे असून, या काळात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग यासारख्या विविध पॅथींनीही एकत्रित केलेले काम कौतुकास्पद असले तरी यासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात तंत्रशुद्ध संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना मिळण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.
विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकृत मुख्य प्रशासकीय इमारतीचे तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झाले. ते म्हणाले, डॉक्टर आणि नर्सचे आरोग्यसेवेचे व्रत अवघड आहे. त्यापेक्षा शिक्षण घेणे अवघड असून, अशी ज्ञान ग्रहणाची शक्ती लाभलेल्यांसाठी पायाभूत सुविधांची पूर्तता होणे गरजेचे आहे. वैद्यकीय शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व असून, त्यासाठी नेतृत्वाची भूमिका पार पाडताना योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कोरोना से मत डरो,
डटके सामना करो
राज्यभरात परीक्षांना विरोध होत असताना मंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आणि आग्रही भूमिका घेतली, ती खरंच कौतुकास्पद असल्याचेही राज्यपालांनी सांगितले. त्यांनी कोरोनाची भीती न बाळगता आलेल्या परिस्थितीचा सामना केल्याने परीक्षा यशस्वी झाल्याचे नमूद करतानाच कोरोनाच्या
भीतीने घाबरून न जाता योग्य ती काळजी घेऊन सामना केल्यास कोरोनापेक्षा भयंकर महामारीवरही मात करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.