कॅन्सर रुग्ण मेळाव्यास प्रतिसाद
By admin | Published: February 4, 2017 11:03 PM2017-02-04T23:03:40+5:302017-02-04T23:03:57+5:30
इंडियन मेडिकल, रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब, वसुंधरा कॅन्सर क्लिनिकचा संयुक्त उपक्रम
नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब आॅफ नाशिक, इनरव्हिल क्लब आॅफ नाशिक व वसुंधरा कॅन्सर क्लिनिक यांच्या संयुक्तविद्यमाने जागतिक कॅन्सर दिनानिमित्त शनिवारी (दि. ४) आयएमए हॉल येथे आयोजित कॅन्सर रुग्ण मेळाव्यास रुग्ण, नातेवाईक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांचा मेळावा, कॅन्सर सुविधांवर मार्गदर्शन प्रदर्शनी, कॅन्सरमधून बऱ्या झालेल्या, कॅन्सरविषयी माहिती जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्या नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा यामुळे उपस्थिताना सखोल माहिती मिळाली. यावेळी ‘कॅन्सर कसा टाळावा’ या विषयावर कॅन्सर सर्जन डॉ. नागेश मदनूरकर, ‘आहार व कॅन्सर’या विषयावर आहारतज्ज्ञ डॉ. रश्मी सोमाणी, ‘कॅन्सर रुग्णांसाठी व्यायाम’ या विषयावर डॉ. अजित हसबनीस, ‘किमोथेरपी व रेडिओथेरपीतील समज / गैरसमज’ या विषयावर डॉ. भूषण नेमाडे, ‘गुणसूत्रे व कॅन्सर’ या विषयावर डॉ. अश्विनी घैसास या तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे गांभिर्य, कॅन्सरपासून दूर राहण्याचा मूलमंत्र मिळावा, कॅन्सरची लक्षणे, तपासण्या, कॅन्सर झाल्यानंतर उपचार, काळजी कशी घ्यावी, काय करावे, काय टाळावे या साऱ्यांची सविस्तर माहिती डॉ. नागेश मदनूरकर यांनी दिली. मेळाव्यात कॅन्सर रुग्णांसाठी सपोर्टिव्ह ट्रिटमेंटची माहिती व साहित्य असणाऱ्या स्टॉलचीही व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी अनिल सुकेणकर, राधेय नवले, शर्मिला मेहता, डॉ. ज्योत्स्ना पवार, डॉ. नागेश मदनूरकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)