नाशिक : नांदगावसह मालेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली असताना गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसते. गुरुवारी तर या दोन्ही तालुक्यांमध्ये पाऊस निरंक राहिला. शुक्रवारीदेखील दिवसभर आभाळ दाटून आलेले असताना पावसाचा केवळ शिडकावा झाला. इतर तालुक्यांमध्येही ढगाळ वातावरण असले तरी कुठेही जोरदार पावसाची नोंद झालेली नाही.
दुष्काळी तालुके असलेल्या नांदगाव तसेच मालेगाव तालुक्याला दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे येथील शेतपिकांचे आणि पशुधनाचेदेखील नुकसान झाले. घरांची पडझड आणि तलाव फुटण्याचेही प्रकार घडले. अतिवृष्टीमुळे ५४ हजार ८७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर १०४ घरांचे नुकसान झाले. १५२ गावांमधील सुमारे ७० हजार शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला. पावसाचा जोर ओसरल्याने मदतकार्य वेगात सुरू झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातून पाऊस गायब झाल्याचे चित्र आहे.
मालेगाव आणि नांदगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये शुक्रवारी शून्य मि.मी. पावसाची नोंद झाली. नाशिक, दिंडोरी, देवळा, निफाड, सिन्नर, चांदवड या तालुक्यांमध्ये अवघा एक ते ३ मि. मी. इतकाच पाऊस झाला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीतदेखील अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही. दिवसभरात केवळ ९७.९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाल्याने पावसाची चिंता अजूनही कायम असल्याचे दिसते.
जिल्ह्यातील एकूण पावासची टक्केवारी ७८.६५ इतकी झाली आहे. मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे आत्तापर्यंत येथे ११४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर नांदगाव तालुक्यातील पावसाची टक्केवारी १३४ इतकी झाली आहे. देवळा तालुक्याची नोंदही १०० टक्के इतकी झाली आहे. जवळपास सर्वच तालुक्यांच्या पावसाची टक्केवारी ५० टक्केच्या पुढे असली तरी जलप्रकल्पातील साठा अपेक्षित नसल्याने शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.