अभ्यासक्र म पाठांतराच्या कोंडवाड्यात बंदिस्त
By admin | Published: January 10, 2015 11:40 PM2015-01-10T23:40:57+5:302015-01-10T23:41:07+5:30
सत्यरंजन धर्माधिकारी : सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त येवल्यात कार्यक्रम
येवला : शाळा व महाविद्यालयातील शिक्षण लोप पावत चालले असून, अभ्यासक्रम पाठांतराच्या कोंडवाड्यात बंदिस्त होत चालले आहे याचा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या जबाबदार घटकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी येवल्यात केले.
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष, द्विजन्मशताब्दी संस्थापक स्व. माधवराव नागडेकर यांची जन्मशताब्दी व विद्यार्थी गुणगौरव समारंभ प्रांगणात झाला. यावेळी बोलताना न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, मी स्वत: शिकत असल्यापासून वर्ग खोल्यात बंद करून शिक्षण देण्याची पारंपरिक पद्धत आजतागायत चालू आहे. वर्षानुवर्ष बाल व महाविद्यालयीन विद्यार्थी रडत आहे. मुलांवर जबरदस्ती न करता त्याची वेदना व भावना जाणून शिक्षण देण्याची गरज आहे. आजच्या शिक्षण पद्धतीचे चित्र बदलावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मार्कासाठी परीक्षा व परीक्षेसाठी अभ्यास हे सूत्र न ठेवता सारे काही गुणवत्तावाढीसाठी असले पाहिजे. ज्ञान व माहितीचे मायाजाल ह्यातील फरक जाणून घेण्याची गरज प्रतिपादित करताना वैयक्तिक कामगिरी ही नेहमी चढत्या श्रेणीत असायला हवी, असे सांगितले. मुले निष्कपट, निर्भय, निरागस, असतात. त्यांच्या मनात दुहीची बीजे पेरता काम नये, असेही त्यांनी सुचवले. शाळांमधून शिक्षण हद्दपार होण्यात शिक्षण खात्याचे योगदान मोठे असल्याचा चिमटा न्यायमूर्तींनी घेतला.
न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. प्रास्ताविक संस्थेचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र पटेल यांनी केले. पंकज पारख यांनी यांनी मार्गदर्शन केले. पारितोषिक वितरणाचे संयोजन संजय बिरारी यांनी केले. यासाठी प्रकाश सोनवणे, आसावरी जोशी, वीणा परते यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)