कडाक्याच्या थंडीचा दूध संकलनावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:22 AM2019-01-01T02:22:11+5:302019-01-01T02:22:55+5:30
निफाड तालुक्यात मागील दहा दिवसांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा दूध संकलनावर परिणाम झाला असून, जेथे दिवसाला ४०० लिटर दूध संकलन होत होते तेथे सध्या ३०० लिटर दूध संकलन होत असल्याची माहिती तालुक्यातील वनसगाव येथील दूध संकलन केंद्राचे संचालक किरण शिंदे यांनी दिली.
नाशिक : निफाड तालुक्यात मागील दहा दिवसांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा दूध संकलनावर परिणाम झाला असून, जेथे दिवसाला ४०० लिटर दूध संकलन होत होते तेथे सध्या ३०० लिटर दूध संकलन होत असल्याची माहिती तालुक्यातील वनसगाव येथील दूध संकलन केंद्राचे संचालक किरण शिंदे यांनी दिली.
कडाक्याच्या थंडीचा दुभत्या गायींच्या आहारावर परिणाम होतो. दुभत्या गायींना दररोज दिला जाणारा खुराकही गायी पूर्णपणे खात नसल्याचे दिसून येत असल्याने त्याचा दुधावरही परिणाम होतो. थंडीमुळे दुधाच्या फॅट आणि डीग्रीही कमी होते, असे किरण शिंदे यांनी सांगितले. दुधाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दूध संकलनावरही त्याचा परिणाम होतो. वनसगाव परिसरातील दूध संकलन केंद्रावर ब्राह्मणगाव, खानगाव, सारोळे या गावांबरोबरच परिसरातील शेतकरी दूध आणतात. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण कमी झाले आहे. शिंदे यांच्या केंद्रावर दररोज किमान ४०० लिटर दूध संकलन होते. थंडी वाढल्यापासून दूध संकलनात घट झाली असून, त्याचे प्रमाण ३०० लिटरपर्यंत आले आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक आपल्या घरात हवे तेवढे गरम कपडे अंगावर घेऊन रात्र काढतात. शेकोटी, गरम पाणी, उबदार कपडे यापासून नागरिक स्वत:चे संरक्षण करत असले तरी मुक्या जनावरांना थंडीपासून बचाव करताना मोठी अडचण निर्माण होत आहे . दिवसा गार वारा, रात्री कडाक्याची थंडी, पहाटे दवबिंदू आणि हिमकण अंगावर घेताना जनावरांचा जीव कासावीस होतो आहे, असे भेंडाळी येथील शेतकरी भाऊसाहेब कमानकर यांनी सांगितले. पत्र्याचे शेड अथवा गवताचा झाप यात १० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात जनावरे तग धरू शकतात. मात्र सलग दहा ते अकरा दिवसांपासून सहा अंशांच्या खाली तापमान असल्याने जनावरांचा जीव धोक्यात येऊ लागला आहे, असे कमानकर यांनी सांगितले.