नाशिक : गेल्या तीन-चार दिवसांपासून शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाने गुरुवारी (दि.९) हजेरी कायम ठेवली आहे. गुरुवारी गिरणारे परिसरात सायंकाळी चारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी उशिरा मखमलाबाद, सातपूर, मातोरी परिसरात पावसाची हजेरी कायम होती.रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जोरदार पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली होती. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मंगळवारी शहर व जिल्ह्यात जोरदार सलामी दिली होती. बुधवारीही ओझर, पिंपळगाव, चांदवड व निफाड या तालुक्यांच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. गुरुवारी सकाळी आकाश निरभ्र होते. दुपारनंतर शहर व जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायद्याचा असला तरी सततच्या पावसाने रब्बीच्या पिकांवर मावा व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस आणखी दोन-तीन दिवस राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावर्षी तर थेट जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. यंदाच्या पावसामुळे जिल्ह्यातील ९० टक्क्याहून अधिक धरणे भरली असून, ज्या काही दोन-चार धरणांमध्ये पाणी कमी होते, त्या धरणांना या परतीच्या पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
परतीच्या पावसाने हजेरी कायम
By admin | Published: October 10, 2014 1:40 AM