सैन्यदलात नोकरीसाठी बनावट दाखले दिल्याचा प्रकार उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 01:51 AM2021-09-11T01:51:12+5:302021-09-11T01:51:57+5:30
अहमदनगरच्या नाथनगरमधून सैन्यदलातील नोकरीसाठी बनावट दाखले तयार करून सैन्य दलाची फसवणूक करणाऱ्या पाथर्डीतील शैक्षणिक संस्थेविरोधात पोलिसांच्या मदतीने देवळाली कॅम्प येथील सैन्याच्या गुप्तचर विभागाने (मिलिटरी इन्टेलिजन्स) संयुक्त कारवाई करून दोघांना अटक केली असून, या प्रकरणात अहमदनगरच्या पाथर्डी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प : अहमदनगरच्या नाथनगरमधून सैन्यदलातील नोकरीसाठी बनावट दाखले तयार करून सैन्य दलाची फसवणूक करणाऱ्या पाथर्डीतील शैक्षणिक संस्थेविरोधात पोलिसांच्या मदतीने देवळाली कॅम्प येथील सैन्याच्या गुप्तचर विभागाने (मिलिटरी इन्टेलिजन्स) संयुक्त कारवाई करून दोघांना अटक केली असून, या प्रकरणात अहमदनगरच्या पाथर्डी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरातील नाथनगरमध्ये मारुती शिरसाठ व त्याचे काही साथीदार हे बनावट शाळेची कागदपत्रे तयार करून त्या मोबदल्यात पैसे घेत असल्याची माहिती सैन्याच्या गोपनीय सूत्रांना मिळाली होती. संशयितांकडून पैशांच्या बदल्यात कागदपत्रे स्वीकारून, बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने काही तरुण सरकारी व सैन्यदलात नोकऱ्या हस्तगत करीत असल्याची माहिती सैन्यातील गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व मिलिटरी इंटेलिजन्स देवळाली कॅम्प (नाशिक) यांनी छापा घातलेल्या ठिकाणी बनावट कागदपत्रांचे दस्तऐवज व त्याला लागणारे साहित्य मिळून आले. संत भगवानबाबा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय अकोला (ता. पाथर्डी), संत भगवानबाबा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय घाटशीळ पारगाव (ता. शिरूर कासार, जिल्हा बीड), श्री नागनाथ विद्यालय पिंपळगाव (टप्पा) (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), जि. प. प्राथमिक शाळा चिंचपूर इजदे (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरी (ता.पाथर्डी जि.अहमदनगर) या विद्यालयाचे दाखले व बनावट शिक्के व साहित्य आढळून आले. याप्रकरणी आरोपी मारुती आनंदराव शिरसाठ (५२, रा. जांभळी, ता. पाथर्डी ), दत्तू नवनाथ गर्जे ( ४०, रा. अकोला, ता. पाथर्डी) यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांनी कुंडलिक दगडू जायभाये (रा. अनपटवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), मच्छिंद्र कदम (रा. मानूर, ता. शिरूर कासार, जि. बीड), अजय ऊर्फ जय राजाराम टिळे (रा. वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी, जि. नाशिक), शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा. पिंपळद, ता.नाशिक) यांना सैन्यदलात नोकरी मिळविण्यासाठी बनावट दाखले दिल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाथर्डी पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.