लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी पुरेशी बेडची व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा, रेमडेसिवीर इंजेक्शन व पुरेशी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध राहील, याकडे लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या.
उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा लहाडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव आदी उपस्थित होते. काेरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना चांगली सेवा मिळायला हवी. त्यासाठी स्टाफच्या कामाचे नियोजन करा, अशा सूचना आमदार कोकाटे यांनी डॉ. लहाडे यांना केल्या. यावेळी तहसीलदार कोताडे, डॉ. मोहन बच्छाव, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनीही विधायक सूचना केल्या. दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. त्यांना १९ हजार ७३३ रुपये मासिक मानधनावर संबंधित ठेकेदाराने नियुक्त केले असून, प्रत्यक्षात हातात ८ हजार रुपयेच मानधन मिळत असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. याविषयी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
चौकट-
रेमडेसिवीरचा पुरवठा व्हावा...
अनेक रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज पडते. मात्र, त्याचा पुरेसा पुरवठा जिल्हास्तरावरून होत नाही. त्यामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होते. रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून दररोज पुरेल इतका रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा व पुरेशी कोरोना प्रतिबंधक लस सिन्नरला पाठवावी, अशी मागणी यावेळी आमदार कोकाटे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे भ्रमणध्वनीद्वारे केली.
चौकट-
स्टाफ वाढवा...
वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, आऊटसोर्सिंगमधील सहाय्यक स्टाफची संख्या वाढविणे गरजेचे आहे. मात्र, त्याचबरोबर ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याही ड्युट्या उपजिल्हा रुग्णालयात लावून घ्या, असे निर्देशही कोकाटे यांनी यावेळी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले.