पेठ औद्योगिक वसाहतीला मिळावी नवसंजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:43 PM2020-05-30T22:43:53+5:302020-05-30T23:55:21+5:30

कोरोनाची महामारी, त्यामुळे झालेले लॉकडाउन आणि मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरातील कंपन्यांचे झालेले शटर डाउन यामुळे आता ग्रीन झोन असलेल्या पेठ येथील औद्योगिक वसाहतीस नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली असून, यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार व छोटे व्यवसायिक यांना उत्पादनाची चांगली संधी निर्माण होणे शक्य झाले आहे.

Revitalization of Peth Industrial Estate! | पेठ औद्योगिक वसाहतीला मिळावी नवसंजीवनी!

पेठ येथील औद्योगिक वसाहतीची जागा.

Next
ठळक मुद्देमहानगरातील छोट्या उद्योगांना चांगली संधी

रामदास शिंदे ।
पेठ : कोरोनाची महामारी, त्यामुळे झालेले लॉकडाउन आणि मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरातील कंपन्यांचे झालेले शटर डाउन यामुळे आता ग्रीन झोन असलेल्या पेठ येथील औद्योगिक वसाहतीस नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली असून, यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार व छोटे व्यवसायिक यांना उत्पादनाची चांगली संधी निर्माण होणे शक्य झाले आहे.
नाशिक ते बलसाड महामार्गावर पेठ शहराच्या पश्चिमेस औद्योगिक वसाहतीसाठी जागा आरक्षित करण्यात आली असून, १९९०च्या सुमारास या ठिकाणी काही उद्योग सुरूही झाले होते. मात्र कोणत्याही उद्योगासाठी आवश्यक असलेल्या रस्ता, वीज व पाणी या महत्त्वांच्या गरजांची पूर्तता होऊ न शकल्यामुळे एकेक करून सर्व उद्योग बंद पडले. नंतरच्या काळात पेठ येथे शिराळे धरण तसेच गुजरात राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे कामही अंतिम टप्प्यात आले असले तरी भूखंड आरक्षित असूनही उद्योजकांनी नव्याने कारखाने सुरू करण्याचे धाडस दाखवले नाही.
सद्या कोरोनामुळे मुंबई, पुणे, नाशिक, बलसाड, वापी, सेलवास, ठाणे, कल्याण येथील अनेक छोट्या उद्योजकांना परप्रांतीय स्थलांतरित कामगार गावी परतल्याने शिवाय सर्वच नियमांचे पालन करून उद्योग सुरू करणे अवघड होऊन बसले आहे. तर दुसरीकडे पेठ, सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यात स्थलांतरित झालेले शेतमजूर हाताला काम नाही म्हणून हातावर हात ठेवून बसले आहेत.

बेरोजगारीचा प्रश्न मिटेल
पेठ येथील औद्योगिक वसाहत सुरू केल्यास सर्वात महत्त्वाचे स्थानिकांना नोकऱ्या मिळतील आणि वर्षानुवर्ष केवळ टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी उच्चशिक्षित तरुण द्राक्षबागेत काम करतात अशा तरुणांना संधी मिळेल. आदिवासी भागात शिक्षणाचा स्तर उंचावला असून, अनेक विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेऊन घरी बसले आहेत. महाराष्ट्र शासनात विधानसभा उपाध्यक्षपदी असलेले नरहरी झिरवाळ हे पेठ तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. किमान त्यांच्या या कार्यकाळात तरी पेठची औद्योगिक वसाहत कार्यान्वित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पेठ शहर हे महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारे शहर असून, पेठची औद्योगिक वसाहत सुरू झाल्यास दोन्ही राज्यांतून उद्योगधंदे येऊ शकतात. यामुळे स्थानिक बेरोजगारांचा प्रश्न निकाली निघणार असून, लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून यापुढील काळात पाठपुरावा करून उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
- गणेश गवळी, पेठ

Web Title: Revitalization of Peth Industrial Estate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.