आडगाव परिसरातील रिंगरोडचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:33 AM2019-07-24T00:33:26+5:302019-07-24T00:33:46+5:30
आडगाव परिसरात रिंगरोडचे मोठे जाळे पसरले असून, बहुतांश रिंगरोड अर्धवट आहेत. आडगाव परिसराचा वाढता विस्तार बघता रिंगरोडची कामे पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नाशिक : आडगाव परिसरात रिंगरोडचे मोठे जाळे पसरले असून, बहुतांश रिंगरोड अर्धवट आहेत. आडगाव परिसराचा वाढता विस्तार बघता रिंगरोडची कामे पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील एक किलोमीटरचा चांगला रस्ता तोडून नवीन स्मार्ट रोड करून शहर स्मार्ट होईल का असा सवाल उपस्थित करत रस्ते नसलेल्या ठिकाणचे रिंगरोड पूर्ण करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
आडगाव परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे. आडगाव गावठाण मळे परिसराबरोबर कॉलनी परिसराचा विस्तार वाढत आहे. पण आडगाव परिसरातील बहुतांश डीपीरोड रखडलेले असून, त्यामुळे परिसराचा विकास खुंटला आहे. आडगाव-म्हसरूळ शिव रोडवर वाढलेली वर्दळ लक्षात घेता त्याचे रुंदीकरण, जत्रा हॉटेलसमोरील आडगाव-म्हसरूळ १०० फुटी रस्ता, आडगाव-म्हसरूळ-मेडिकल कॉलेज ते औरंगाबादरोड, जत्रा लिंक रोडला जोडणारे अनेक डीपीरोड अर्धवट आहेत. त्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण करण्यात यावे.
नाशिक शहर एक किलोमीटरचा चांगला रस्ता खोदून स्मार्ट रोड करून शहर स्मार्ट होईल का? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहे. स्मार्ट करण्यापेक्षा रिंगरोडचे जाळे पूर्ण केल्यास शहर परिसराचा विकास होईल, असे मत नागरिक व्यक्त करत आहे.
स्थायी समितीचे नवनियुक्त सभापती उद्धव निमसे यांचा हा प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागातील अपूर्ण असलेली रिंगरोडची कामे पूर्ण करतील, अशी अपेक्षा प्रभागातील नागरिक व्यक्त करत आहे. आडगाव परिसरातील नव्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी ड्रेनेजदेखील नाही त्यामुळे अशा गरजेच्या ठिकाणी ड्रेनेज टाकण्यात यावे, अशी मागणी आडगाव परिसरातील नागरिक करत आहे.