विश्वासात न घेतल्याची रिपाइंला खंत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 07:25 PM2019-10-09T19:25:13+5:302019-10-09T19:27:44+5:30
रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष महायुतीत सहभागी झाला असून, या पक्षाला सहा जागा सोडल्याचे महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले असले तरी रिपाइंच्या काही जागांवर सेनेने उमेदवार उभे करून बंडखोरी केली आहे. तर काही मतदारसंघ रिपाइंला अनुकूल नसतानाही युतीने अशा जागा सोडून रिपाइंला अडचणीत आणले
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाला संपूर्ण उत्तर महाराष्टÑात एकही जागा न सोडण्यात आल्याने अगोदरच नाराजी असताना त्यातच महायुतीच्या उमेदवारांकडून निवडणूक नियोजन व प्रचारात रिपाइंच्या नेत्या, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत आहे. त्यामुळेच की काय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी नाशिक जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकडे पाठ फिरवून उत्तर महाराष्टÑातील अन्य उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे.
रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष महायुतीत सहभागी झाला असून, या पक्षाला सहा जागा सोडल्याचे महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले असले तरी रिपाइंच्या काही जागांवर सेनेने उमेदवार उभे करून बंडखोरी केली आहे. तर काही मतदारसंघ रिपाइंला अनुकूल नसतानाही युतीने अशा जागा सोडून रिपाइंला अडचणीत आणले आहे. नाशिक जिल्ह्यात एकही जागा रिपाइंला मिळू शकली नाही. या पक्षाच्या वतीने देवळाली व पश्चिम मतदारसंघाची मागणी केली गेली, मात्र तीदेखील मान्य करण्यात आली नाही त्यामुळे पक्षाचा अधिकृत एकही उमेदवार नसल्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच युतीच्या उमेदवारांनी नामांकन दाखल करताना रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलविण्यात आले नाही. रिपाइं महायुतीत सहभागी असल्याने भाजपा व सेनेने त्या प्रमाणात रिपाइंला प्राधान्य द्यावयास हवे, मात्र रिपाइंचा फक्त झेंडा वापरून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोठेही स्थान दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात भाजप-सेनेकडून मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळेच जिल्हाध्यक्ष प्रकार लोंढे यांनी उत्तर महाराष्टÑातील अन्य जिल्ह्यांमध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे. जिल्हाध्यक्षच शहरात नसल्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्यांनीदेखील प्रचारातून अंग काढून घेतले आहे. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारपत्रकात पाहिजे त्या प्रमाणात रिपाइंला स्थान दिले जात नसल्याची तक्रार आहे. पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे छायाचित्र न लावणे, पक्षाचे नाव न टाकणे, स्थानिक रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारापासून व नियोजनापासून डावलणे असे प्रकार युतीकडून केले जात आहेत. नाशिक शहरात रिपाइंचे मतदान पाहता, पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची जाहीर सभा घेण्याचे ठरत असताना युतीच्या उमेदवारांनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असले तरी, त्याविषयी कोणतेही नियोजन केले जात नसल्याचे पाहून पक्षाला व कार्यकर्त्यांना मानसन्मान नसेल तर घरात बसणेच योग्य राहील, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.