मालेगावच्या ऋषभचे आज युक्रेनमधून उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 01:04 AM2022-03-04T01:04:31+5:302022-03-04T01:04:53+5:30
गेल्या दहा- बारा दिवसांपासून या आणीबाणीच्या परिस्थितीत युक्रेन देशात अडकून पडलेल्या येथील १२ बंगला परिसरातील ऋषभ देवरे हा अखेर ४ मार्चला सकाळी सात वाजता मायदेशी परत येण्यासाठी निघणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत ऋषभ मालेगावी घरी येणार असल्याचे त्याचे वडील अशोक देवरे यांनी सांगितले.
मालेगाव कॅम्प : गेल्या दहा- बारा दिवसांपासून या आणीबाणीच्या परिस्थितीत युक्रेन देशात अडकून पडलेल्या येथील १२ बंगला परिसरातील ऋषभ देवरे हा अखेर ४ मार्चला सकाळी सात वाजता मायदेशी परत येण्यासाठी निघणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत ऋषभ मालेगावी घरी येणार असल्याचे त्याचे वडील अशोक देवरे यांनी सांगितले. ऋषभची आई वर्षा देवरे यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे.
मालेगावातील प्रगतशील शेतकरी अशोक देवरे व वर्षा देवरे यांचा चिरंजीव ऋषभ हा उच्च एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी ६ वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये गेला होता. त्याच्या शिक्षणाचे अवघे तीन महिने शिल्लक होते. त्यात रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला होता. दररोज मोबाइलवरून त्याच्याशी संपर्क होत होता, तर टीव्हीवरील बातम्यांमुळे घरच्यांची काळजी वाढली होती. युक्रेनमधील ओडेशा या मोठ्या शहरात तो शिक्षण घेत होता. युद्ध सुरू झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी ओडेशा शहरावर रशियातर्फे ५ मिसाइल टाकण्यात आले होते व शहर उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली होती. सर्वत्र हाहाकार दिसून येत होता. देवरे कुटुंबीय त्याच्या संपर्कात होते, तर अनेकदा मोबाइल रेंज मिळत नव्हती. युद्ध सुरू झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी ओडेशा सोडण्याचा निर्णय घेतला व ते खासगी बसने रोमानिया येथे येऊन पोहोचले. तेथे बुचारिष्ठ शहरात सध्या त्याचा मुक्काम आहे व तो दुसऱ्या देशात स्थलांतरित झाल्याने सुरक्षित असल्याचे अशोक देवरे यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजता विद्यार्थ्यांसह ऋषभ बहुप्रतीक्षेनंतर मायदेशी मालेगाव येथे पोहचणार असल्याचे ऋषभचे वडील अशोक देवरे यांनी सांगितले.