दारणा नदीची पूरस्थिती अद्याप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:54 AM2019-08-06T00:54:17+5:302019-08-06T00:55:12+5:30
जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. दारणा धरण परिसरात रविवारी मुसळधार पाऊस कायम होता त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीने धोकादायक पातळी ओलांडली.
नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. दारणा धरण परिसरात रविवारी मुसळधार पाऊस कायम होता त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीने धोकादायक पातळी ओलांडली. त्यामुळे चेहेडी, पळसे, शिंदे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. सोमवारी (दि.५)देखील ही परिस्थिती कायम असल्याचे चित्र परिसरात दिसून आले.
रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दारणा धरणातून दुपारी ४ पर्यंत ३९२५० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
तसेच चेहेडी गावातील नाशिक-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाला पुराचे पाणी लागल्यामुळे सदर पूल बंद करण्यात आला. त्यामुळे नवीन पुलाची दुसरी बाजू खुली करण्यात आली. सोमवारीदेखील या पुलाला पाणी लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा पूल बंदच ठेवण्यात आला आहे. सोमवारी दारणा धरण परिक्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, धरणातून दुपारी चारपर्यंत ३७५९६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, दारणेच्या पाणीपातळीतील धोकादायक स्थिती कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी या पुलावरुन रहदारी करु नये असे आवाहन करण्यात आले होते.
वाहतूक बंद ठेवण्याची मागणी
पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या अनेक रहिवाशांची घरे अजूनही पाण्यात आहेत. पुरामुळे चेहेडी शिवार परिसरातील नागरिकांना या ठिकाणी मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच स्थानिक रहिवाशांनी दारणा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी कायमचा बंद ठेवण्याची मागणी केली आहे.